
विराट कोहलीच्या बॅटमधून दोन सामने झाले तरी अजून ‘भोपळा’च फुटला नाही! आणि मग काय – गप्पीष्ट क्रिकेटजगत जागं झालंय. कुणी म्हणतं, ‘फॉर्म हरवला’, तर कुणी म्हणतं, ‘थोडी विश्रांती घ्यावी लागेल’. पण हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणतो, ‘थांबा जरा, एकदा विराटच्या बॅटमधून धावा निघायला लागल्या की, मग जगातला कुठलाही गोलंदाज त्याला थांबवू शकणार नाही!’
इरफानचा सूर अगदी खात्रीचा होता. तो म्हणतो, ‘विराटला आता स्ट्राइक रोटेट करायचं आहे, धावफलक हलता ठेवायचा आहे. एकदा तो चालू झाला की, मग त्याची बॅट थांबणार नाही आणि विरोधकांच्या तंबूत मात्र धावाधाव उडेल.’ खरं तर कोहलीसारखा फलंदाज फॉर्ममध्ये आला की त्याच्या बॅटमधून शब्द नव्हे, संगीत उमटतं!
हिंदुस्थानने ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आधीच गमावली आहे. पहिल्या दोन सामन्यांत विराटची बॅट शांत, अगदी साधी एक धावही नाही. पण शनिवारी सिडनीत होणाऱ्या अखेरच्या सामन्याकडे आता सगळय़ांचं लक्ष लागलंय. कारण हा सामना केवळ मालिकेचा नाही, तर विराटच्या ‘फॉर्म’चा प्रश्न आहे.
या विश्लेषणाच्या चर्चेत इरफान पठाणसोबत अभिषेक नायर आणि आकाश चोप्रादेखील होते. नायर म्हणाला, ‘आपले वेगवान गोलंदाजांना आता झटपट विकेट मिळवायला हव्यात. ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ांवर त्यांना मदत मिळते आहे, पण ती वाया जाऊ देऊ नये.’
तर चोप्रा म्हणाला, ‘खेळपट्टी जर फिरकीसाठी अनुकूल असेल, तर तीन वेगवान गोलंदाज घेण्याचे कारण नाही. कुलदीपला खेळवावे, मधल्या षटकांत दबाव निर्माण करावा. फिरकीनेच सामना हिंदुस्थानच्या बाजूने वळवता येईल.
एकूण काय, आता सगळय़ांची नजर सिडनीवर आणि विराटच्या बॅटवर!
तो जर धावा करायला लागला तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचं नशीबही ‘डाऊन अंडर’ जाईल!
बाकी, कोहलीचा फॉर्म परतला की हिंदुस्थानचा उत्साहही पुन्हा मैदानावर दिसेल. कारण विराट म्हणजे फक्त खेळाडू नाही, ती एक मनस्वी लय आहे, जी एकदा लागली की सामन्याचे रूपच बदलते.


























































