
परळ येथील टाटा रुग्णालयाने स्तन कर्करोगावरील उपचारांमध्ये आणखी एक मोलाचे पाऊल टाकले आहे. टाटा रुग्णालयाने केलेल्या संशोधनात कार्बोप्लॅटीन हे औषध स्तन कर्करोगावरील उपचारात रामबाण ठरले आहे. या औषधाच्या वापराने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून हे औषध सर्वसामान्य रुग्णांनाही परवडेल इतक्या किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे.
ट्रिपल-निगेटिव्ह स्तन कर्करुग्णांच्या उपचारामध्ये केमोथेरपीसोबत कार्बोप्लॅटीन या औषधाचा वापर केल्यास रुग्णांचा बरे होण्याच्या आणि त्यांचे आयुष्य वाढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे टाटा रुग्णालयातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले. कार्बोप्लॅटीन हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि इतर कर्करोगांमध्ये नियमित वापरले जाणारे केमोथेरपी औषध आहे, अशी माहिती टाटा मेमोरियल पेंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले.
संशोधनाला मिळाली जागतिक मान्यता
‘टीएमसी प्लॅटिनम स्टडी’ असे नाव दिलेल्या या संशोधनाचा अहवाल ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी’ या जगातील सर्वोच्च कर्करोगावरील प्रथम क्रमांकाच्या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले असून त्याला जागतिक मान्यता मिळाल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे माजी संचालक आणि मुख्य संशोधक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.
तरुण महिलांना सर्वाधिक लाभ
हिंदुस्थानात सुमारे 30 टक्के स्तन कर्करोग हे ट्रिपल-निगेटिव्ह प्रकारातील आहेत. तरुण महिलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. 50 वर्षांखालील महिलांमध्ये कार्बोप्लॅटीनमुळे मृत्यू टळण्याचे प्रमाण 66 टक्क्यांवरून 77 टक्क्यांपर्यंत वाढले. तसेच रोगमुक्त होण्याचे प्रमाण 62 टक्क्यांवरून 74 टक्के झाले. मात्र 50 वर्षांवरील महिलांमध्ये या औषधाचा लाभ मर्यादित असल्याचे दिसून आले.






























































