सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण – फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास, राजीनामा द्या! – अंबादास दानवे

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने हातावर पेनाने सुसाईट नोट लिहिली असून यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला. आपला छळ सुरू असल्याची तक्रारी महिला डॉक्टरने केली होती, मात्र तिची दखल घेण्यात आली नाही. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली असून गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

अंबादास दानवे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून डॉ. संपदा मुंडे यांनी लिहिलेला तक्रार अर्ज शेअर केला आहे. यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृहखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ, असे दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी एकामागोमाग एक आठ सवाल सरकारला केले.

  • एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?
  • ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?
  • महिला डॉक्टरचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?
  • हे खासदार महोदय नेमके कोण?
  •  या महिला डॉक्टरला बीड वरून हिनवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?
  •  ‘पारदर्शक’ आणि ‘गतिमान’ शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?
  •  चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?
  •  या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?

आज ‘लाडकी बहीण’ पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्ती गरज आहे. फडणवीस जी, तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात.. राजीनामा द्या, अशी मागणी दानवे यांनी केली. यावेळी दानवे यांनी महिला डॉक्टरने दिलेल्या जबाबाचेही फोटो शेअर केले.

हा त्या महिला डॉक्टरचा जबाब! तिला विनाकारण तक्रारी करून छळले गेले. तिला छळणारे अधिकारी कोणाच्या मदतीने पळाले? हा महाडिक आणि अन्य अधिकारी कुठे आहेत, मिस्टर सीएम देवेंद्र फडणवीस? एरव्ही टाचणी पडली तरी कल्ला करणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या आज कुठे आहेत? की ही डॉक्टर मराठवाड्याची कन्या म्हणून मुद्दाम डोळेझाक केली जाते आहे? विजया रहाटकर ताई, हा जबाब वाचा आणि महिलांना न्याय देण्याचा आपला बाणा थोडाफार जिवंत आले तर आपण यात हस्तक्षेप कराल, अशी मागणीही दानवे यांनी केली.