
प्रामाणिक कार्यकर्त्यांची कदर केली नाही तर जेवढ्या जोराने वरती चालले आहात, तेवढ्याच वेगाने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगला जुन्या कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे. यामुळे पक्षातच जुने कार्यकर्ते आणि आयात कार्यकर्ते असे दोन गट पडलेले आहेत. सोलापुरात तर या इन्कमिंग विरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. आता हाच आयातीचा धागा पकडून नितीन गडकरी यांनी खास नागपुरी भाषेत भाजपचे कान टोचले आहेत.
चांगला माणूस हा घर की मुर्गी दाल बराबर आणि बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो. जरा, जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. जर प्रामाणिक कार्यकर्त्याची कदर ठेवली नाही तर जेवढ्या जोराने वरती चालला आहात, तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. जुन्या कार्यकर्त्याची आठवण ठेवा, असे गडकरी म्हणाले.





























































