माळीवाडगावात ग्रामस्थांना मिळाला पुस्तकांचा फराळ; साजरी झाली ज्ञान, संस्कार अन प्रेरणेची दिवाळी!

>> प्रकाश जोशी

गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथे यंदाची दिवाळी काहीतरी वेगळीच रंगली! फटाके, मिठाई आणि फराळाऐवजी ज्ञानाचा सुगंध आणि पुस्तकांचा गंध दरवळला. कारण, येथे साजरी झाली ‘पुस्तकांचा फराळ’ म्हणून ओळखली जाणारी आगळीवेगळी दिवाळी ग्रामस्थांनी पुस्तके न्याहाळत, वाचनाचा आनंद घेत साजरी केली..

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले माळीवाडगावात ग्रामस्थांना मिळाला पुस्तकांचा फराळ माळीवाडगावचे भूमिपुत्र नितिन शिवराम सोनवणे हे नोकरीसोबतच समाजात बौद्धिकतेची आणि वाचनसंस्कृतीची ज्योत पेटती ठेवण्याचे कार्य गेली अनेक वर्षे अविरतपणे करत आहेत. ‘आपण एखाद्या सणाला फटाके आणि मिठाईत अडकवू नये; तर तो ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा देणारा सण व्हावा’ हा त्यांचा ठाम विश्वास. दरवर्षी स्वतःच्या खर्चाने ते हा उपक्रम राबवतात. या अर्थपूर्ण दिवाळी साजरीकरणामुळे माळीवाडगावात दरवर्षी नव्या उर्जेची आणि ज्ञानप्रकाशाची पहाट उगवते. येथील ज्ञानेश्वर वाघचौरे, राजीव खिल्लारे, किशोर पवार हे या दिवाळी फराळाचे साक्षीदार आहेत.

वाचकांचा होतो सत्कार

माळीवाडगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले नितिन सोनवणे हे दिवाळीला आपल्या गावात येतात आणि गावातील सर्व मंडळींना पुस्तके फराळ म्हणून वाटतात आणि वर्षभर गावातच वाचण्यासाठी ठेवतात. हे सर्व मोफत आणि स्वतःच्या खर्चाने. वर्षभर किशोर वाघचौरे नावाचा विद्यार्थी ही पुस्तके लोकांना वाचण्यासाठी ठेवतो आणि रेकॉर्ड ठेवतो. वर्षभर जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या वाचकांची निवड केली जाते आणि त्यांचा पुस्तकांच्या भेटीने सत्कार केला जातो.

जसे दिवाळीत गोड फराळ वाटला जातो, तसेच या उपक्रमातून ज्ञानाचा फराळ वाटला जातो. या उपक्रमामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळते आणि सणांच्या गडबडीतही ज्ञानाचा सुगंध दरवळतो. खऱ्या अर्थाने ‘ज्ञानाची दिवाळी’ साजरी करणाऱ्या नितिन सोनवणे यांच्या या अभिनव उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

वाचनाची गोडी लागतेय

माळीवाडगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना वाचनाची गोडी लागावी, या हेतूने गावात वाचनालय सुरू केलेले असून, ते वर्षभर चालते. अनेकजण त्याचा लाभ घेतात. परंतु वाचन संस्कृतीचा प्रवाह, प्रसार व्हावा या उद्देशाने गेल्या दोन वर्षापासून ‘दिवाळीत पुस्तकांचा फराळ’ हा मित्र मंडळींच्या सहकार्याने उपक्रम सुरू केला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नितीन सोनवणे ‘सामना’शी बोलताना म्ह‌णाले. यावेळी झालेल्या या उपक्रमातून नवीन वाचकांची नोंद झाली असून, वरचेवर ती वाढत जाईल, असा विश्वासही सोनवणे यांनी व्यक्त केला. समाजातील वाचनसंस्कृतीला चालना मिळावी हा हेतू. सर्व वयोगटातील पुस्तकप्रेमींचा सहभाग. प्रत्येक सहभागीला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके भेट म्हणून दिली जातात. वाचकांचे अनुभव, पुस्तक समीक्षा आणि वाचनप्रेरणादायी संवाद कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमामुळे अनेक तरुण, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे. पुस्तकांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण, नवीन दृष्टिकोन आणि सकारात्मकतेचा संदेश समाजात पोहोचत असल्याचे नितीन सोनवणे म्हणाले.

ब्रेनसाठी फराळाची गरज

माळीवाडगावमध्ये वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो. वाचनालयाचा फायदा घेत आहे. त्याचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने नितीन सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिवाळीच्या दिवशी ‘पुस्तकांचा फराळ’ हा उपक्रम आम्ही सुरू केला. त्याचा चांगला फायदा होत आहे. ब्रेनसाठी वाचनरूपी पुस्तकांची गरज आहे. ती या फराळातून भागवण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमातून वेगळा आनंद मिळतो. विशेष म्हणजे आमची १५ ते २० जणांची टीम असून, वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अशा ग्रंथालयाचा चांगला उपयोग होत असल्याचे माळीवाडगाव येथील साहित्यप्रेमी ज्ञानेश्वर वाघचौरे ‘सामना’शी बोलताना म्हणाले.