
मिटमिटा पडेगाव रस्त्यावर आज शनिवारी सायंकाळी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव आत्माराम माने व त्यांची पत्नी अॅड. रत्नमाला माने हे ठार झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता आर्च आंगणसमोर घडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदावरून निवृत्त झालेले डॉ. रामराव आत्माराम माने हे आपल्या पत्नी अॅड. रत्नमाला माने यांच्यासह देशमुखनगर, नित्यानंद पार्कमध्ये राहत होते. त्यांचे मूळगाव धाराशिव जिल्ह्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक, माजी अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रामराव आत्माराम माने (७३) व त्यांच्या पत्नी रत्नमाला साळुंके-माने ह्या हायकोर्टात वकिली करत होत्या. डॉ. माने हे १९८० ते २०२४ या काळात रसायनशास्त्र विभागात कार्यरत होते. २००६ ते २०१० या काळात अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसर उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. या दाम्पत्याच्या पार्थिवावर धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथे रविवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. माने दांपत्यास मूलबाळ नव्हते, मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या पालकाची भूमिका त्यांनी पार पाडली होती. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव माने हे विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला सतत धावून जात असत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे या परिसरातही त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या अपघाताची माहिती कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघाताची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
























































