
बिहारच्या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी भाजपने कहर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छठस्नानासाठी दिल्लीत वासुदेव घाटावर नकली यमुना बनविण्यात आली आहे. या नकली यमुनेत फिल्टर पाणी सोडण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने हा फर्जीवाडा चव्हाटय़ावर आणला असून देशभर याची चर्चा रंगली आहे.
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडीने तिथे प्रचाराची राळ उडवून दिली आहे. त्यामुळे बिथरलेल्या भाजपने बिहारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी छठपूजेचा भावनिक आधार शोधला आहे. छठपूजेनिमित्त हजारो भाविकांसोबत पंतप्रधान मोदी हेदेखील यमुनेत स्नान करून अर्घ्य देणार आहेत. मात्र, मोदींच्या स्नानासाठी नकली यमुना नदी तयार करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ‘एक्स’वर खऱया आणि बनावट यमुनेचा व्हिडीओ शेअर करून ही पोलखोल केली आहे.
भाजपने असे का केले?
दिल्लीत भाजपचे सरकार आल्यापासून यमुना स्वच्छ झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात यमुनेचे पाणी पिण्यायोग्य सोडाच, अन्य वापरासाठीही योग्य नाही. ते मलयुक्त आहे. एखाद्या लहान मुलाने त्या पाण्याने आचमन केल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो. या पाण्यात जास्त वेळ राहिल्यास आजार होऊ शकतात. केंद्रातील आणि दिल्लीतील सरकारला हे नीट माहीत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींसाठी नकली यमुना बनविण्यात आल्याचे सौरभ भारद्वाज म्हणाले. यमुना स्वच्छ आहे तर मोदी त्याच पाण्यात का डुबकी मारत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
भाजपने छठ उत्सवाची अक्षरशः थट्टा चालवली आहे. ही केवळ दिल्लीकरांची किंवा बिहारींची फसवणूक नाही, तर कोटय़वधी श्रद्धाळूच्या भावनांशी खेळ आहे.’ – सौरभ भारद्वाज
कसे आणि काय केले…
- वासुदेव घाट भराव टाकून यमुनेच्या मुख्य प्रवाहापासून तोडला.
- भरावाच्या दुसऱया टोकाला स्वतंत्र जलाशय तयार केला.
- या जलाशयात गंगेचे पाणी सोडण्यात आले आहे.
- हे पाणी वजिराबाद जलशुद्धीकरण केंद्रात फिल्टर केलेले आहे.
- एका छोटय़ा पाइपलाइनद्वारे चोरून हे पाणी वळवण्यात आले.
- याच पाण्यात मोदी छठस्नान, अर्घ्य आणि आचमन करणार आहेत.
























































