
चिपळूणमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे भातकापणी करणाऱया शेतकऱयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे धोक्यात आले असून अनेक ठिकाणी कापणी केलेला भात भिजल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्ण खरीप हंगामात विविध संकटांना सामोरे जात येथील शेतकऱयांनी भातशेती पिकवली होती. मोठय़ा कष्टाने पिकवलेले धान्य घरात आणण्याच्या शेवटच्या क्षणालाही पावसाने धांदल उडवल्याने शेतकरी चिंतातूर झाला.
अवकाळी पावसामुळे या आधीच शंभरहून अधिक शेतकऱयांचे सुमारे 16 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात आता नव्याने भर पडणार आहे. पावसाचा कोणताच अंदाज नसताना पावसाने रंग दाखवण्यास सुरुवात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने कापलेला भात सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यास संधीच दिली नाही.
तालुक्यात अलोरे, पोफळी, शिरगाव, सावर्डे, खडपोली, पिंपळी, मार्गताम्हाणे, असुर्डे, कामथे भागात कमी-अधिक प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांचे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱयांना अस्मानी संकटातून दिलासा देण्यासाठी सरकारने ताताडीने पावले उचलावीत.
भीमराव खरात, शेतकरी, अलोरे
दिवाळीच्या सुट्टीमध्ये असलेले अधिकारी परतल्यानंतर पंचनामे करण्याची कार्यवाही होईल. त्याचा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल. जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण
गुरांच्या चाऱयाचा प्रश्न
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कापणी करून शेतात ठेवलेल्या भाताला बसला आहे. पावसामुळे भाताचे भारे पूर्णपणे भिजून गेले आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीकही आडवे होऊन पाण्यात भिजले आहे. भिजलेल्या भाताला आता काsंब फुटण्याची भीती निर्माण झाली असून यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे तसेच भात भिजल्यामुळे जनावरांसाठीचा महत्त्वाचा चारा असलेला पेंढादेखील वाया जाणार आहे. त्यामुळे गुरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.


























































