AI च्या माध्यमातून भावाचे आणि बहिणींचे बनवले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ; ब्लॅकमेलिंगला कंटाळून 19 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

हरियाणा येथील फरीदाबादमधील जुने पोलिस स्टेशन परिसरातील बसेलवा कॉलनीतून एक अतिशय भयानक घटना समोर आली आहे. येथे एआयचा वापर करून मॉर्फ केलेल्या AI-generated फोटो आणि व्हिडीओमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. या तरूणाकडे त्याचे व त्याच्या तिनही बहिणींचे अश्लील फोटो व्हिडीओ पाठवून 20 हजार रुपयांची मागणी केली. त्याने पैसे दिले नाही तर हे फोटो व्हायरल केले जातील अशी धमकी देण्यात आली. याच नैराश्यातून 19 वर्षांच्या तरूणाने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबादमधील बसेल्वा कॉलनीत ही घटना घडली. राहुल भारती (19) असे या तरूणाचे नाव असून, कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक राहुलचा मित्र असल्याचे समजते.

राहुलचे वडील मनोज भारती यांनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून हे ब्लॅकमेलिंग सुरू होते. माझ्या मुलाचा राहुलचा फोन हॅक झाला होता. त्यामुळे त्याला सातत्याने WhatsApp वर त्याचे आणि त्याच्या बहिणींचे मॉर्फ केलेल्या AI-generated फोटो आणि व्हिडीओ येत होते. या प्रकारामुळे राहुल खूप घाबरला होता, असे त्यांनी सांगितले.

गेल्या 15 दिवसांपासून राहुलचे वर्तन पूर्णपणे बदलले असल्याचा दावा त्यांनी केला. तो घरातही फारसा कोणाशी बोलत नव्हता. एकटाच खोलीत बसून असायचा. या प्रकारामुळे त्याचे मन विचलीत झाले होते, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. अशातच शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास राहुलने त्याच्या खोलीत सल्फा (कीटकनाशक गोळ्या) खाल्या. कुटुंबाला माहिती मिळताच त्यांनी लगेचच राहुलला रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच राहुलचा मृत्यू झाला.

राहुलचा फोन तपासल्यावर त्याच्या वडिलांना साहिल नावाच्या व्यक्तीसोबतची व्हॉट्सअॅप चॅट्स आढळली. या चॅट्समध्ये साहिलने राहुल आणि त्याच्या बहिणींचे एआय-जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ पाठवले आणि पैशांची मागणी केली. साहिलने राहुलला धमकी दिली की जर त्याने पैसे दिले नाहीत तर तो फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. एवढेच नाहीतर त्याने राहुलला आत्महत्या करण्यात प्रवृत्तही केले होते.

राहुलच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार, त्यांच्या मुलाचा एक मित्र नीरज याचाही यात सहभाग असू शकतो, असे त्यांनी सांगितले. राहुलचे मृत्यूपूर्वीचे शेवटचे फोनवरचे बोलणे नीरजशी झाले होते. पोलीस तक्रारीत साहिल आणि नीरज दोघांचीही नावे आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.