
पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजविणाऱ्या महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील इलिट ‘ब’ गटातील सामन्यात यजमान चंदिगडवर 144 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पृथ्वी शॉचे दमदार द्विशतक, ऋतुराज गायकवाडचे शतक, विकी ओस्तवाल, मुकेश चौधरी व रामपृष्ण घोष यांची अफलातून गोलंदाजी ही महाराष्ट्राच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली.
महाराष्ट्राने 313 धावसंख्या उभारल्यानंतर चंदिगडला 209 धावसंख्येवर रोखून पहिल्या डावात 104 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर महाराष्ट्राने दुसरा डाव 3 बाद 359 धावसंख्येवर घोषित करून चंदिगडकुढे विजयासाठी 463 धावांचे कठीण आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जुन आझाद (168) व कर्णधार मानव व्होरा (58) यांनी काही वेळ महाराष्ट्राच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला, मात्र त्यानंतर चंदिगडचा डाव 94.1 षटकांत 319 धावांवर संकुष्टात आला.
महाराष्ट्राकडून मुकेश चौधरी व रामकृष्ण घोष यांनी प्रत्येकी 4 बळी टिपले.



























































