आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगमध्ये ठाणेकर चमकले; इक्विपड व क्लासिक प्रकारात हिंदुस्थानला तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात पार पडलेल्या जागतिक मास्टर्स क्लासिक व इक्विपड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ठाण्यातील दत्तात्रेय उतेकर व विशाल उंबळकर यांनी चमकदार कामगिरी करत हिंदुस्थानसह ठाणेकरांची मान उंचावली आहे. महाराष्ट्राच्या चमूने यातील इक्विपड स्पर्धा प्रकारात तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कास्य पदकांची, तर क्लासिक प्रकारात तीन कांस्य पदकांची कमाई केली.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मास्टर्स खेळाडूंची निवड हिंदुस्थानच्या संघात झाली होती. यात ठाणे आनंद नगर येथील विशाल उंबळकर यांनी इक्विपड प्रकारात कास्य, तर ढोकाळी येथील दत्तात्रेय उतेकर यांनी क्लासिक प्रकारात कास्य व इक्विपड प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 12 ते 19 ऑक्टोबर या काळात ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी जगभरातून 40, 50, 60 व 70 वर्षावरील कुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या.

खेळाडूंच्या या उत्पृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन मुंबई विभागाचे अध्यक्ष एदोदी भास्करन व सचिव संजय सरदेसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेतील कास्य पदकाची कमाई करणारे विशाल उंबळकर यांना 2022 च्या न्यूझीलंडमध्ये झालेल्या का@मनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त झाले होते, तर त्याच वर्षी हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांना ‘स्ट्राँग मॅन ऑफ इंडिया’ हा सन्मान प्राप्त झाला होता.

पदक प्राप्त खेळाडू

इक्विपड – संगीता ढोले, डॉ. शर्वरी इनामदार, दत्तात्रेय उतेकर यांना सुवर्ण. अर्चना काळे, किरण त्यागी यांना रौप्य, तर विशाल उंबळकर यांना कास्य पदक.
क्लासिक – डॉ. शर्वरी इनामदार, रंजीता मिश्रा, दत्तात्रय उत्तेकर यांना कास्य पदक.