गंगाराम गवाणकर अनंतात विलीन, नाट्यरसिकांनी साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकातून मालवणी बोलीला लोकमान्यतेची भरजरी वस्त्रs नेसवणारे प्रख्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. बोरिवली येथील दौलतनगर स्मशानभूमीत गवाणकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिश्कील आणि मनमिळाऊ स्वभावाच्या या रंगकर्मीला निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नाटय़रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

गवाणकर यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दहिसरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची ही एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेली. नाटकासाठी जगलेल्या या कलावंताची अखेरची यात्रा नाट्यगृहातूनच निघाली. तत्पूर्वी, सकाळी त्यांचे पार्थिव बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात अंत्यदर्शनासाठी ठेण्यात आले. यावेळी अभिनेता प्रदीप कबरे, समीर चौघुले, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अनिल गवस, डॉ. श्वेता पेंडसे, पॅडी कांबळे, प्रसाद कांबळी, देवेंद्र पेम, दिगंबर नाईक, शुभदा वराडकर, ज्योती निसळ, संजय देशपांडे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, सांस्पृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, काँग्रेस नेते भूषण पाटील आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

नाटक हे गवाणकर यांचे पहिले प्रेम होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी नाटकाला, रंगभूमीला वाहून घेतले होते. वस्त्रहरण, वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ यांसारखी 20 हून अधिक नाटके त्यांनी लिहिली. आपल्या कसदार आणि विनोदी लेखनाने खळखळून हसवणारे गवाणकर आज सर्वांना रडवून गेले.

अखेरपर्यंत लिहिता हात

गवाणकर हे चळवळय़ा स्वभावाचे होते. ते स्वस्थ बसणाऱयांपैकी नव्हते. पाच हजारांहून अधिक प्रयोग झालेल्या ‘वस्त्रहरण’सह अनेक नाटके लिहिल्यानंतरही गवाणकर यांची लेखणी सतत कार्यरत होती. अखेरच्या काळातही त्यांचे लिखाण सुरू होते. ‘मोगरा’ ही एकांकिका त्यांनी अर्धी लिहून काढली होती. आजारपणामुळे ती पूर्ण होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.