
रतन टाटा यांच्या निधनाला एक वर्ष होत नाही तोच टाटा समूहात वर्चस्वाचे शीतयुद्ध सुरू झाले आहे. मेहली मिस्त्री हे या शीतयुद्धाचे पहिले बळी ठरले आहेत. रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या मिस्त्री यांना टाटा ट्रस्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
टाटा समूहातील जवळपास 400 पंपन्यांची होल्डिंग पंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’मध्ये टाटा ट्रस्टची तब्बल 66 टक्के भागीदारी आहे. त्यामुळे ही ट्रस्ट अत्यंत शक्तिशाली समजली जाते. या ट्रस्टमधील विश्वस्त मंडळाचा टाटा समूहाच्या निर्णयावर प्रभाव असतो. मेहली मिस्त्री यांना 2022 साली पहिल्यांदा विश्वस्त मंडळावर घेतले गेले. 28 ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. त्यामुळे त्यांच्या फेरनियुक्तीची चर्चा होती. मात्र ती फोन ठरली.
समान मते पडूनही मिस्त्री बाहेर कसे?
ट्रस्टमधील तीन सदस्य मेहली मिस्त्री यांच्या विरोधात असले तरी तीन सदस्यांचा त्यांना पाठिंबा आहे. असे असतानाही त्यांना बाहेर जावे लागणार आहे. त्याचे कारण मागील आठवड्यात झालेल्या एका बैठकीत दडले आहे. या बैठकीत टाटा ट्रस्टने वेणू श्रीनिवासन यांना आजीव विश्वस्त म्हणून पुनर्नियुक्त केले होते. त्या वेळी मिस्त्री यांच्यासह सर्वांनीच त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र भविष्यात कुठल्याही विश्वस्ताची नियुक्ती सर्वसंमतीनेच होईल अन्यथा ही नियुक्तीच रद्द मानली जाईल, असे ठरले होते. त्याचा फटका आता मिस्त्री यांनाच बसला आहे. आता मिस्त्री यांचे टाटा ट्रस्टशी असलेले नाते संपुष्टात येणार आहे.
कोण बाजूने, कोण विरोधात?
सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱया सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टवर मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीला तीन विश्वस्तांनी विरोध केला. त्यात टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा, टीव्हीएस समूहाचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन, माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांचा समावेश आहे. तर सिटी बँक इंडियाचे माजी सीईओ परमित झवेरी, मुंबईतील कायदेतज्ञ दरायस खंबाटा आणि जहांगीर एचसी जहांगीर यांनी मिस्त्री यांना पाठिंबा दिला.
नोएल टाटा नवे सत्तापेंद्र?
रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर नोएल टाटा यांनी टाटा ट्रस्टच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. एक प्रकारे संपूर्ण समूहाचे नेतृत्व त्यांच्या हाती आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ट्रस्टमध्ये मतभेद झाले होते. नोएल आणि मेहली मिस्त्री हे दोन गट होते. श्रीनिवासन आणि विजय सिंह हे नोएल टाटांच्या बाजूचे आहेत, तर झवेरी, खंबाटा आणि जहांगीर हे मिस्त्री यांच्या जवळचे होते. आता मिस्त्री यांची गच्छंती होणार असल्याने टाटा समूहामध्ये नोएल टाटा यांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.






























































