
कुणाचे नशीब कधी आणि कसे पालटेल, ते सांगता येत नाही. याची प्रचीती संयुक्त अरब अमिरातीमध्ये काम करणारा 29 वर्षीय हिंदुस्थानी तरुण अनिलकुमार बोल्ला याला आली. अनिलकुमार बोल्ला याने यूएई लॉटरीचा सर्वात मोठा 100 दशलक्ष दिरहम म्हणजे अंदाजे 240 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला. कामगार म्हणून अबू धाबीला गेलेला अनिलकुमार आता अब्जाधीश बनला आहे. 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या 23 व्या ‘लकी डे’ ड्रॉमध्ये अनिल कुमार याने हा ऐतिहासिक विक्रम केला. अनिलकुमार नियमितपणे या लॉटरीत भाग घेत असे. या वेळी त्याने शेवटचा अंक 11 असलेली लॉटरी काढली. लॉटरीच्या नियमांनुसार, त्याने एकट्याने हे तिकीट खरेदी केल्यामुळे त्याला ही संपूर्ण 240 कोटींची रक्कम मिळणार आहे. जॅकपॉट जिंकल्याचे समजताच अनिलकुमारला आनंदाचा धक्का बसला. त्याने सांगितले की, ‘‘मी घरी आराम करत होतो, तेव्हा मला यूएई लॉटरी टीमचा फोन आला. मला अजिबात विश्वास बसत नव्हता, मी त्यांना पुनः पुन्हा सांगायला लावले. यावर अजूनही विश्वास बसत नाहीये!’





























































