मतांसाठी मोदी काहीही करू शकतात, नाचूही शकतात! राहुल गांधी यांची बोचरी टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘नरेंद्र मोदी हे मतं मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. तुम्ही नाचायला सांगितलं तर ते स्टेजवर नाचूही शकतात,’ अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल यांनी यावेळी मोदींवर जोरदार तोफ डागली. ‘मोदींनी प्रत्येक गोष्टीचा ड्रामा करून टाकलाय. यमुनेत स्नान करणार असं सांगून ते स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करतात. त्यांना यमुना नदीशी काही देणंघेणं नाही. छठपूजेशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त मतं पाहिजेत. त्यासाठी ते काहीही करतील. तुम्ही त्यांना सांगा की, आम्ही तुम्हाला मत देतो, भाषण करू नका, स्टेजवर येऊन नाचून दाखवा, तर ते नाचूनही दाखवतील, असे राहुल गांधी म्हणाले.

नितीश कुमार केवळ मुखवटा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. ‘नितीश हे केवळ सरकारचा मुखवटा आहेत. रिमोट पंट्रोल भाजपच्या हाती आहे. बिहारचा खरा कारभार तीन-चार लोक चालवत आहेत. त्यांना सामाजिक न्यायाशी काही देणेघेणे नाही. त्यामुळेच जात जनगणनेवर मोदी चकार शब्द बोलत नाहीत, असा आरोप राहुल यांनी केला.

मोदी ट्रम्पना घाबरतात!

‘नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात. ट्रम्प रोजच्या रोज वेगवेगळय़ा देशात जाऊन मोदींचा अपमान करतात. मोदींना दम देऊन मी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवल्याचे सांगतात, पण मोदींच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही. ट्रम्प खोटे बोलताहेत असे ते बोलायलाच तयार नाहीत,’ असे राहुल म्हणाले.

फक्त सूटबूटवाल्यांसोबत दिसतील!

‘मोदींकडून जे काही करून घ्यायचं आहे ते निवडणुकीआधीच करून घ्या, नंतर ते तुम्हाला दिसणारही नाहीत. निवडणुकीनंतर ते फक्त अंबानींच्या लग्नात दिसतील. सूटबूटवाल्यांसोबत दिसतील. शेतकरी आणि मजुरांसोबत दिसणार नाहीत,’ असा सणसणीत टोला राहुल यांनी हाणला.