धक्कादायक! ठाण्यात प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला पेटवले, मुलीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू

किरकोळ वादातून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवल्याची धक्कादायक घटना बाळकुम परिसरात घडली आहे. या घटनेत 17 वर्षीय मुलगी 80 टक्के होरपळली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी हल्लेखोर प्रियकराला अटक केली आहे.

जखमी 17 वर्षीय मुलगी ही आई व दोन भावंडांसोबत बाळकुमच्या यशराज व्हिसा इमारतीजवळील चाळीत राहते. तिचे चेंबूर येथे राहणाऱया अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान भाऊबीजेच्या दिवशी त्या दोघांमध्ये भांडण झाले. त्या वेळी माथेफिरू मुलाने पीडितेला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. 24 ऑक्टोबरला पीडित मुलगी घरी एकटी असताना विकृत प्रियकर तिच्या घरी आला होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात प्रियकराने पेट्रोल टाकून तिला पेटवले. घरातून धूर येत असल्याचे दिसताच शेजाऱयांनी धाव घेतली असता ती मुलगी होरपळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. तिला तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.

जुन्या भांडणाच्या वादातून कृत्य

पीडित मुलगी ही भाऊबीजेनिमित्त चेंबूरला नातेवाइकांकडे गेली होती. त्या वेळी माथेफिरू प्रियकर तिला भेटण्यासाठी आला. तेथे किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. यावर संतापलेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण केली आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. दरम्यान, पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.