
ऊसदराच्या तोडग्यासाठी आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसदरासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. उसाचा भाव निश्चित करून हा भाव मिळवण्यासाठी शेतकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यात विविध मार्गांनी आणि विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असला, तरी कर्नाटकात सुरू झालेल्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर कारखान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर जिह्यात कारखान्यांकडून 1 नोव्हेंबरपूर्वीच हंगाम सुरू करण्यात येत आहे. उसाची पळवापळवी टाळण्यासाठी कारखान्यांनी मुदतीपूर्वीच कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. कारखानदारांकडून केवळ एफआरपीची रक्कम जाहीर केली जात असल्याने शिवाय गेल्या हंगामातील जादाची बिले देण्याबाबत कारखानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे.
कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर मंगळवारी (दि. 28) ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले. यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखणे, कारखान्यासमोर आंदोलन करणे, वाहने पेटवून देणे अशा स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यापूर्वी ऊसदराचा प्रश्न मार्गी लावून हंगाम सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी शेतकऱयांमधून होत आहे.






























































