
तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांना बंदुकीचा धाक दाखवत व चाकूने हल्ला करून सोन्याचे दागिने व रोकड चोरटय़ांनी लुटून नेली. चोरटय़ांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निलंगा येथील काही महिला भाविक कुटुंबीयासह मोटारीने तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. तुळजापूरपासून 4 किलोमीटर अंतरावर चंद्रलोक हॉटेलजवळ महिला भाविक थांबल्या असता दबा धरून बसलेल्या 4-5 जणांच्या टोळीने थांबलेल्या मोटारीची चावी काढून घेत बंदूक व चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने व पुरुषांकडील रोकड काढून घेतली. जाताना या चोरटय़ांनी तीन महिलांवर चाकूने वार केले. या चोरांच्या टोळीने याचदरम्यान आणखीन काही महिला भाविकांवर हल्ला करून दागिने लुटल्याचे घटनास्थळावरील पुजारी जीवनराजे अमृतराव यांनी सांगितले.






























































