संगमनेरमध्ये दीड हजार किलो गोमांस जप्त

प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात गोहत्येसाठी हॉटस्पॉट म्हणून गणल्या गेलेल्या संगमनेर शहरात गोपाष्टमीसारख्या पवित्र सणाच्या आदल्यादिवशीच गोहत्या प्रकरणामुळे शहर हादरले आहे. आज पहाटे पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून दीड हजार किलो गोमांस जप्त केले आहे. हिंदू धर्मात पूजनीय असलेल्या गायीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उघडपणे गोवंश कत्तल सुरू असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.

आज मंगळवारी पहाटे शहरातील मदिनानगर परिसरातील बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलीस पथकाने छापा टाकला. पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱया कत्तलखान्यातून तीन लाख रुपयांचे तब्बल दीड हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. येथे सलीम साटम कुरेशी, गुलाम फरीद साबीर कुरेशी (दोघेही रा. बुद्धविहार शेजारी, संगमनेर) हे गोवंश कत्तल करत असल्याचे गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. छापेमारीदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच हे दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. तथापि, घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात गोमांस, कत्तलीसाठी वापरलेली साहित्य आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पांडुरंग पटेकर, राहुल सारबंदे, अनिल कडलग यांच्या पथकाने यांच्या पथकाने बुद्धविहारामागे धाडसी कारवाई केली.

पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर संशय

शहरात सुरू असलेले कत्तलखाने पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय सुरू राहू शकतात का? असा सवाल उभा राहत असून, नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना या प्रश्नावर थेट पोलिसांनाच जबाबदार धरत आहेत. शहरातील काही भागांत ‘गोहत्याबंदी केवळ नावापुरती’, केली असून, काही ठिकाणी छुप्या मार्गाने कत्तलखाने सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण मागील आठवडय़ात आणि काल केलेल्या कारवाईतून हेच सिद्ध होत आहे. संगमनेरातील काही भागांत दिवसाढवळ्या जनावरांची तस्करी होत असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केवळ निवडक ठिकाणीच केली जाते, असा आरोप नागरिक करत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

‘गोहत्या बंदी’ की फसवणूक?

कुरेशी समाजाने काही महिन्यांपूर्वी स्वतःच गोहत्या बंदीची घोषणा करून समाजाची बदनामी होत असल्याचे मान्य केले होते. आता आम्ही गोहत्या करणार नाही आणि जनावरे खरेदी करणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, आजची वस्तुस्थिती या घोषणेला चपराक देणारी आहे. कारण, संगमनेरमधील कुरण, कोल्हेवाडी, मदिनानगर, कोल्हेवाडी रोड आणि आसपासच्या परिसरात खुलेआम गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. उघडय़ावर टाकलेले मांस खाण्यासाठी त्या-त्या भागात कुत्र्यांचे जत्थे रस्त्यांवर उडय़ा मारताना दिसतात. हे दृश्य केवळ अस्वच्छतेचे नव्हे, तर मानवीतेला काळिमा फासणारे आहे.