वाघ-मानव संघर्ष पेटला;  चंद्रपुरात दोन महिन्यांत अकरा जणांचा बळी

चंद्रपूर जिह्यात वाघ आणि मानव संघर्ष पेटला असून गेल्या दोन महिन्यांत वाघाने अकरा जणांच्या नरडीचा घोट घेतला आहे. सतत घडणाऱया या घटनांनी जंगलात असलेली गावे दहशतीत आली असून या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. वन्य जिवांचे संरक्षण व्हायला हवे, पण माणसांच्या संरक्षणाचे काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.

चंद्रपूर जिह्यात वाघांची संख्या वाढल्याने वाघ आता गावाकडे वळू लागले. जंगलालगत असलेल्या गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. लोकांना शेती आणि सरपण आणण्यासाठी जंगलात जाणे अवघड झाले आहे. जिह्यात सुमारे अडीचशेच्या वर वाघ आहेत. यातील पन्नास वाघ ताडोबा प्रकल्पात, तर इतर आरक्षित जंगलात आहेत. आता ताडोबातील वाघही बाहेर पडू लागले आहेत. संरक्षित जंगल आणि गावाजवळच्या सुरक्षित ठिकाणी वाघ आसरा घेऊ लागलेत. यातूनच वाघ आणि मानव संघर्ष वाढू लागलाय. यावर कायमस्वरूपी तोडगा अजूनही निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले तर अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही यावर सरकारी प्रयत्नांची गरज व्यक्त केली आहे.