
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते अंकलीदरम्यान चोकाक, अतिग्रे, हातकणंगले, मजले, माणगाववाडी हद्दीतील महामार्गासाठी बाधित जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी होणार होती. मात्र, बाधित शेतकरी, व्यापारी यांनी बाधित जमिनीची चौपट नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी व व्यापारी यांनी भूमीअभिलेख कार्यालय हातकणंगले येथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत चौपट भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत बाधित जमिनीची मोजणी करू न देण्याची आक्रमक भूमिका घेत कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाचे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाधीत शेतकऱयांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. प्राधिकरणाचे कर्मचारी दमदाटीची भाषा करत असून, ऐन दिवाळीतच बाधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्या गेल्या; पण अतिग्रे गावातील एकाही बाधित शेतकऱ्याला नोटीस मिळाली नाही. मात्र, प्राधिकरणचे कर्मचारी अंधाधुंद कारभार करत दांडगाव्याने मोजणी करत असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला.
गेल्या दोन वर्षांपासून हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील 10 गावांतील बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लढा सुरू आहे. मात्र, यावर अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. त्यातच आज प्राधिकरण व भूमिअभीलेख यांच्या वतीने बाधित जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार होती. त्याला विरोध म्हणून चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या पाच गावांतील शेतकऱयांनी त्याला विरोध केला. उपजिल्हाधिकारी भूसंपादन रूपाली चौगुले यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे शेतकरी व प्रशासन यांची बैठक संपन्न झाली. मात्र, जोपर्यंत चौपट नुकसानभरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी करू नये, या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. यावेळी विक्रम पाटील, दिपक वाडकर, अभिजित इंगवले, सुरेश खोत, अमीत पाटील, मिलिंद चौगुले, अजित रणावरे, गोमटेश पाटील, विजय पाटोळे यांच्यासह बाधित शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
आम्ही सर्व शेतकरी जमिनी द्यायला तयार आहोत. मात्र, चौपट नुकसानभरपाईबाबत गेल्या दोन वर्षांत निर्णय झालेला नाही. त्यातच प्राधिकरणाकरणाचे कर्मचारी दादागिरीची भाषा वापरून ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चौपट भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही.
– डॉ. अभिजित इंगवले, हातकणंगले






























































