
२५० कोटी रुपये थकवल्याने वसुलीसाठी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. एप्रिल २०२५ पासून महापालिकेने करवसुलीला सुरुवात केली असून आतापर्यंत फक्त ४३ कोटी इतकीच पाणीपट्टी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. अजून २०७कोटी रुपये वसुली करणे बाकी असून मार्च २०२६ पर्यंत ही वसुली सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या पाणी बिलाच्या रकमेत २०२३-२४ आर्थिक वर्षाचे ९२ कोटी २८ लाख रुपये थकबाकीपोटीचे आहेत. त्यात आता भर पडली असून चालू वर्षाचे १५७ कोटी ८० लाख रुपयांची बिले थकीत आहेत. २०२४-२५ आर्थिक वर्षात प्रशासनाने १४८ कोटी ९५ लाखांची पाणीपट्टी वसूल केली होती. मात्र यंदाच्या वर्षी महापालिकेने फक्त १८ टक्के म्हणजेच ४३ लाख रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने थकबाकी व चालू बिलांची १०० टक्के वसुली करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देताच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
… तर महापालिका पाणी कापणार
पाणीपट्टी थकवणाऱ्या ग्राहकांनी लवकरात लवकर थकीत रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे, अन्यथा बडगा उगारत नळजोडणी खंडित करण्यात येणार असून मोटार पंप जप्त किंवा मीटर रूम सील करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. या कारवाईनंतर परस्पर नळजोडणी करणाऱ्या थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.





























































