सामना अग्रलेख – …म्हणे दीपस्तंभ!

पोलिसी बळाचा वापर करून जनतेचा विरोध चिरडणे व सरकारच्या निवडक मित्रांसाठी पर्यावरणाची ऐशीतैशीकरून बंदरांची निर्मिती करणे हाच जगभरासाठी भारताचा दीपस्तंभ आहे, असे पंतप्रधान मोदी यांना म्हणायचे आहे काय? डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया रसातळाला गेला. बेरोजगारीचा नवा जागतिक विक्रम आपण प्रस्थापित केला. देशातील 80 कोटी गरीबांना सरकार मोफत धान्य पुरवते, देशातील मूठभरांची श्रीमंती वाढते आहे व गरीब अधिक गरीब होत आहेत. तरीही जागतिक पातळीवरील तणाव व अस्थिरतेच्या परिस्थितीत भारत दीपस्तंभाप्रमाणे जगाला दिशा दाखवतो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर तो मोठाच विनोद म्हणायला हवा!

स्वप्ने दाखविण्यात आपल्या पंतप्रधानांचा हातखंडा आहे. सरकारच्या कामगिरीची काळी बाजू जनतेसमोर कधी येऊच नये, यासाठी नवनवीन स्वप्नांचा बाजार मांडायचा आणि शब्दांचे खेळ करीत वर्तमान स्थितीपासून जनतेचे लक्ष भलतीकडेच वळवायचे असा त्यांचा खाक्या आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर न मांडता आपल्या सरकारचे उदात्तीकरण करून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून घेण्याचे प्रयोग पंतप्रधान करीत असतात. मुंबईत बुधवारी झालेल्या ‘इंडिया मेरिटाईम’ परिषदेत बोलतानाही पंतप्रधान मोदी यांनी हाच कित्ता गिरवला. ‘जागतिक अस्थिरता व तणावाच्या वातावरणात भारत एका खंबीर दीपस्तंभाप्रमाणे उभा आहे’, असे जोरकस विधान पंतप्रधानांनी केले. या परिषदेसाठी जगभरातून आलेल्या सागरी व्यापार व नौकानयन क्षेत्रातील मान्यवरांसमोर भारतातील नौकानयन व व्यापार क्षेत्र आणि बंदरांचा विकास व विस्तार कसा होतो आहे, हे त्यांनी ठासून सांगितले. आपल्या देशाची वाटचाल आणि प्रगती याविषयी विदेशी प्रतिनिधींसमोर गोडवे गाणे हे गैर नाही. मात्र जगभरासाठी आम्ही कसे दीपस्तंभ आहोत, ही बढाई कशासाठी? जागतिक क्षितिजावर विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करून भारत जगभरातील देशांसाठी खरोखरच दीपस्तंभ ठरत असेल तर ते देशासाठी नक्कीच गौरवशाली आहे. मात्र प्रत्यक्षात खरेच तशी स्थिती आहे काय? सद्यस्थितीत जगभरात

प्रे.ट्रम्प यांच्या कृपेने

जी अस्थिरता निर्माण झाली आहे वा जो तणाव वाढीस लागला आहे, त्यामुळे जगभरातील देशांना भारताकडून दिशादर्शन किंवा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन खरेच मिळते आहे काय? भारताकडून अथवा पंतप्रधान मोदी यांच्याकडून काही तोडगे किंवा फॉर्म्युले घेऊन जगभरातील देश अस्थिरतेच्या अंधारवाटेतून प्रकाशवाटा शोधत आहेत, असे चित्र खरेच जागतिक पातळीवर दिसते आहे काय? तसे नसेल तर जागतिक पातळीवर आपण कसे दीपस्तंभाच्या भूमिकेत आहोत, हे पंतप्रधान मोदी यांचे विधान हास्यास्पद ठरते. अमेरिकेचे विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष व मोदी यांचे खास मित्र डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जगभरातील देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकत सुटले आहेत. तसा टॅरिफ बॉम्ब त्यांनी भारतावरही टाकला. आधी 25 टक्के आणि नंतर 50 टक्के टेरिफ प्रे. ट्रम्प यांनी भारतावर लादले. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला जो जबर फटका बसला त्यातून जगभरातील देशांना दिशा मिळेल, असा कोणता मार्ग मोदी सरकारने काढला? रशियाकडून तेल खरेदी बंद करा, असे फर्मान प्रे. ट्रम्प यांनी सोडले. त्यावर ‘आम्ही रशियाकडून तेल खरेदी बंद करणार नाही’, असे बाणेदार उत्तर आपल्या पंतप्रधानांनी दिले काय? उलट ‘मी सांगितल्याप्रमाणे रशियाकडून सुरू असलेली तेल खरेदी बंद करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी मान्य केले आहे’, असे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी

जाहीरपणे सांगितले. ट्रम्प महाशय म्हणतात त्याप्रमाणे रशियाकडून सुरू असलेली तेल खरेदी आपण खरोखरच बंद केली असेल तर ही जी काही माघार आहे, त्यालाच आपण ‘दीपस्तंभ’ वगैरे मानायचे काय? भारत आता ‘ब्लू इकॉनॉमी’च्या दिशेने झेप घेत आहे व त्यासाठी पुढील 25 वर्षे निर्णायक असतील, असे पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत सांगितले. ‘ब्लू इकॉनॉमी’ म्हणजे समुद्र, किनारपट्ट्या, नद्या आदी जलस्रोतांचा वापर करून शाश्वत व पर्यावरणपूरक असा आर्थिक विकास साधणे. पर्यावरणाचा सत्यानाश करून कोकणात जे वाढवण बंदर उभारण्याचा व त्यासाठी समुद्रात खोलवर ड्रिलिंग करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला तो पर्यावरणाच्या कुठल्या व्याख्येत बसतो, हे पंतप्रधानांनी सांगायला हवे. पोलिसी बळाचा वापर करून जनतेचा विरोध चिरडणे व सरकारच्या निवडक मित्रांसाठी पर्यावरणाची ‘ऐशी-तैशी’ करून बंदरांची निर्मिती करणे हाच जगभरासाठी भारताचा दीपस्तंभ आहे, असे पंतप्रधान मोदी यांना म्हणायचे आहे काय? डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया रसातळाला गेला. बेरोजगारीचा नवा जागतिक विक्रम आपण प्रस्थापित केला. देशातील 80 कोटी गरीबांना सरकार मोफत धान्य पुरवते, देशातील मूठभरांची श्रीमंती वाढते आहे व गरीब अधिक गरीब होत आहेत. तरीही जागतिक पातळीवरील तणाव व अस्थिरतेच्या परिस्थितीत भारत ‘दीपस्तंभा’प्रमाणे जगाला दिशा दाखवतो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर तो मोठाच विनोद म्हणायला हवा!