वेब न्यूज – जागो ग्राहक जागो

सोशल मीडियामुळे आज आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या एखाद्या छोट्या गोष्टीचीदेखील लगेच माहिती मिळत असते. अगदी लहानात लहान घटनादेखील बातमीच्या स्वरूपात आपल्या समोर येत असते. सध्या गुजरातमधील पूनम बेन नावाची एक महिला अशीच प्रसिद्ध झाली आहे. गुजरातच्या अंपुर भागात राहणाऱ्या पूनम बेन यांनी आपल्या शिंप्यावर दावा दाखल केला आणि चक्क जिंकलादेखील. ही घटना सोशल मीडियावर झळकली आणि लगेच चर्चेत आली.

पूनम बेन या अहमदाबादच्या रहिवासी आहेत. त्यांच्या नात्यात एक लग्न होते आणि त्या लग्नात सर्वात आकर्षक वेशभूषा करण्याचे पूनम बेन यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी आपल्या परिसरातील एका प्रसिद्ध बुटिकमध्ये डिझायनर ब्लाऊज शिवण्यासाठी दिला. ब्लाऊज शिलाईचे 4395 अॅडव्हान्स म्हणून जमादेखील केले. लग्नाच्या एक आठवडा आधी ब्लाऊज शिवून देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले. जर काही गडबड झाली असेल तर ती एका आठवडय़ात सुधारणे शक्य होईल असा त्यामागचा हेतू होता.

मात्र लग्नाची तारीख आली तरी ब्लाऊज काही मिळाला नाही. हताश झालेल्या पूनम बेन यांना दुसरे कपडे घालून लग्नाला जावे लागले. बुटिकने त्यांचे अॅडव्हान्स पैसेदेखील परत करण्यास नकार दिला. चिडलेल्या पूनम बेनने मग सरळ त्या बुटिकवर मानहानीचा आणि फसवणुकीचा गुन्हा जिल्हा ग्राहक मंचात दाखल केला. हे प्रकरण किरकोळ समजत शिंप्याने सुनावणीला हजेरीदेखील लावण्याची तसदी घेतली नाही. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ग्राहक मंचाने मग त्याला चांगलाच दणका दिला. पूनम बेनने अॅडव्हान्स म्हणून दिलेले 4395 रुपये व्याजासकट परत करण्याचे तसेच मानसिक त्रासाबद्दल 5000 रुपये दंड आणि कोर्ट खर्चाचे 2000 रुपये पूनम बेनला देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

 स्पायडरमॅन