शैलगृहांच्या विश्वात – गोरधगिरीवरील शैलगृहे

>> डॉ. मंजिरी भालेराव

[email protected]

बाराबर आणि नागार्जुनी या टेकडय़ांवरील शैलगृहांबाबत प्रा. डॉ. सुष्मिता बासू मजुमदार व त्यांच्या चमूने नवे संशोधन केले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून या दोनही समूहाकडे पाहिले असता या शैलगृहांचे वेगळेच अर्थ दिसायला लागतात.

बाराबर आणि नागार्जुनी दोन्ही टेकडय़ांमध्ये असलेल्या शैलगृहांमध्ये ती तयार करताना कोरलेले लेख आहेत, तसेच काही शतकांनंतर तिथे आलेले प्रवासी, तीर्थयात्री आणि काही राजकीय व्यक्ती यांनीही कोरलेले लेख आहेत. आजीविकांचे कोणतेही अधिकृत धार्मिक साहित्य उपलब्ध नसल्याने ही शैलगृहे म्हणजे बौद्ध भिक्षूंच्या वर्षावासासाठी जशी लेणी केली गेली, तशीच आहेत असेच आतापर्यंत सर्वमान्य मत होते, पण काही वर्षांपूर्वी कोलकता विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभागातील प्राध्यापिका डॉ. सुष्मिता बासू मजुमदार व त्यांच्या चमूने या दोन्ही ठिकाणी असलेल्या शैलगृहांचा पुन्हा नव्याने अभ्यास केला. या ठिकाणी असलेल्या सर्व शिलालेखांचा नव्याने विचार केला. त्यानंतर त्यांनी एक पूर्णपणे वेगळा निष्कर्ष काढला. पाटणा येथील के. पी. जयस्वाल संशोधन संस्था या प्रकल्पाची प्रायोजक होती. पुढे 2017 मध्ये या संशोधन प्रकल्पाचे पुस्तक रूपात प्रकाशन झाले.

येथील शिलालेखांमध्ये विविध प्रकारचे आणि विविध काळात कोरलेले लेख आहेत. इ.स.च्या 5 व्या-6 व्या शतकातील मौखरी राजवंशाचा राजा अनंतवर्मन याचे काही लेख या दोन्ही टेकडय़ांतील शैलगृहांमध्ये आहेत. अशोकाच्या एका लेखात त्याने खलतिक पर्वतामधील गुहेसाठी दिलेले दान असा उल्लेख केल्यामुळे आतापर्यंत सर्व अभ्यासकांनी या टेकडीचे नाव खलतिक होते असे मानले, पण सुप्रसिद्ध जर्मन संस्कृत आणि प्राच्यविद्यातज्ञ प्रा. हॅरी फाल्क यांनी तसेच प्रा. डॉ. सुष्मिता बासू मजुमदार यांनी पतंजलीने याचा अर्थ जंगलाजवळचा डोंगर असा केला आहे, हे दाखवून दिले. त्यामुळे खलतिक म्हणजे जंगलाने वेढलेला डोंगर असाही त्या लेखातील नावाचा अर्थ होऊ शकतो. त्याउलट लोमश ऋषी लेण्याजवळ कोरलेले ‘गोरधगिरी’ हे या टेकडीचे खरे नाव असावे. ओदिशातील राजा खारवेल याच्या उदयगिरी-खंडगिरी येथील लेखातही ‘गोरधगिरी’ हे नाव येते. बराबार किंवा बाराबार हे नाव मौखरी राजाच्या लेखात आलेल्या ‘प्रवरगिरी’ या नावाचे आजचे रूप असावे, असेही या दोन अभ्यासकांचे मत आहे.

लोमश ऋषी लेणे हे सर्वात देखणे आणि कोरीव काम असलेले लेणे आहे. याच्यावर असलेल्या नक्षीकामात हत्तींच्या मध्ये असलेल्या ज्याला ‘स्तूप’ म्हणून ओळखले गेले ते चिन्ह खरे तर मंखली गोशाल याच्या हातात जो दंड असायचा त्याचे प्रतीकात्मक रूप आहे, असे प्रा. सुष्मिता बासू मजुमदार यांनी सुचवले आहे. बाराबर येथील शैलगृहांवरील पहिल्या भागात आपण आजीविकांची माहिती पाहत असताना या वेळूदंडाचा संदर्भ पहिला होता. या दंडामुळेच त्यांना लोक ‘एकदंडी’ असे म्हणत असत. त्यामुळे या संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा दंडच कदाचित या कमानीत कोरला असावा असे डॉ. बासू यांना वाटते.

याबरोबरच त्यांनी केलेल्या संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे येथील लेखांचे भाषांतर. सम्राट अशोक याचा नातू दशरथ  याच्या नागार्जुनी येथील प्रत्येक शैलगृहातील दानलेखामध्ये ‘निषधी’ असा एक उल्लेख येतो. ‘वाष निषिधीयाये’ या शब्दांचा अर्थ आतापर्यंत वर्षावासातील निवास असा काढला गेला, पण या नवीन संशोधनानुसार ‘निषधी’ या शब्दाचा अर्थ अन्न-पाण्याचा त्याग करून आपल्या जीवनाचा त्याग करणे असा घेतला पाहिजे असे मत मांडले गेले आहे. जैन परंपरेनुसार ‘संल्लेखना’ म्हणजे अन्न-पाण्याचा त्याग करून जीवनाचा त्याग करणे यासारखी या आजीविकांचीही परंपरा होती. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका व्हायच्या वेळेस त्यांनी या शैलगृहांमध्ये वास्तव्य करून आपल्या आयुष्याचा शेवट करावा, यासाठी या सर्व गुंफांची निर्मिती केली गेली होती. हठयोगासारखी अतिशय कठोर साधना हे भिक्षू करत असत. शरीराला क्लेश देऊन मुक्तीच्या मार्गाकडे जात असत. त्यामुळे इथे असलेल्या काही लेखांमध्ये ‘क्लेशकांतार’ म्हणजे अतिशय त्रासदायक असणाऱया जंगलाचा उल्लेख आलेला दिसतो. यानंतर ते या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कायमचे बाहेर पडणार होते.

आजीविक संप्रदाय हा भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या काळातच अतिशय लोकप्रिय झाला होता यात शंका नाही. इ.स. पूर्व 6 वे शतक ते इ.स. 6 व्या शतकापर्यंत त्यांचे संदर्भ आणि उल्लेख निरनिराळ्या शिलालेखांत आणि साहित्यांत आढळून येतात. ‘समतट’ म्हणजे आग्नेय बंगालमध्ये इ.स.च्या 6 व्या शतकात वैन्यगुप्त याचे दान नोंदवलेला ताम्रपट नुकताच ढाका येथून प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आधीच्या राजाने आजीविकांना दिलेले दान त्यानेही चालू ठेवल्याची नोंद आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ताम्रपटात मणिभद्र याच्या आयतनाचा म्हणजे मंदिराचा उल्लेख आहे. कदाचित आजीविकांनी काळाच्या ओघात मणिभद्र यक्षाची उपासना सुरू केली असावी. त्याबरोबरच अनेक प्रकारची पूजा आणि अर्चा करण्यासाठीची धातूची साधने दान दिल्याचाही उल्लेख या लेखात आहे. त्या काळात साधारणपणे सर्व पूजा विधींमध्ये अंतर्भूत असलेल्या धार्मिक विधींचाही उल्लेख इथे केलेला आहे. यावरून असे लक्षात येते की, या संप्रदायाची लोकप्रियता इ.स. च्या 6 व्या शतकातसुद्धा कायम होती.

बाराबर आणि नागार्जुनी या शैलगृहांपासून 24 किलोमीटर अंतरावर असलेले फाल्गु नदीजवळचे गया हे स्थळ गेली कित्येक शतके आपल्या पितरांना मोक्ष मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते. बाराबर आणि नागार्जुनी येथील शैलगृहे ही मुख्यतः आजीविकांना मृत्यूसाठी कठोर साधना करून जीवनचक्रातून मुक्ती मिळण्यासाठी तयार केलेली शैलगृहे आहेत, जी आचंद्रसूर्य टिकणारी असतील. अशा प्रकारे हा परिसर तप, साधना, हठयोग, जन्म आणि मृत्यू यांच्यापासून मुक्तीची आराधना अशा विविध गूढ गोष्टींशी संबंधित आहे. इ.स.च्या 5 व्या-6 व्या शतकातील मौखरी राजवंशाचा राजा अनंतवर्मन याचे काही लेख या दोन्ही टेकडय़ांतील शैलगृहांमध्ये आहेत. त्या लेखातून भूतपती (शिव) आणि पार्वती यांच्या प्रतिमांची स्थापना केल्याचे संदर्भ मिळतात. आजही हा सगळा परिसर सिद्धेश्वर पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे. या पर्वतावर असलेल्या सिद्धेश्वर या शिवमंदिरातील शिवाचे दर्शन घेण्यासाठी श्रावणात खूप दूर वरून हजारो भाविक येथे येतात. त्यामुळे गेली कित्येक शतके एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेला हा सगळा परिसरच एक तीर्थक्षेत्र बनलेला दिसतो.

अशा प्रकारे नवीन संशोधनानंतर या गुंफा समूहाकडे नवीन दृष्टिकोनातून पहिले असता या शैलगृहांचे वेगळेच अर्थ दिसायला लागतात. भारतीय धार्मिक परंपरांशी निगडित स्थापत्याचा असा नव्याने अभ्यास करता येण्यासारखा आहे हे यातून लक्षात येते.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)