
कर्नाटक सरकारचा बंदी आदेश, प्रशासन आणि पोलिसांची दडपशाही झुगारून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी ‘काळा दिन’ पाळला. कर्नाटक सरकारचा निषेध करत काळे ध्वज फडकवीत, तोंडाला, हाताला काळी फीत बांधून मराठी भाषिकांनी भव्य सायकल फेरी काढली. यात हजारो तरुणांचा व महिलांचा सहभाग होता. यावेळी ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
1956 साली बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषिक गावांना जबरदस्तीने कर्नाटकात डांबण्यात आले. 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकचा स्थापना दिन आहे. दरवर्षी हा दिवस सीमाभागातील मराठी भाषिकांकडून ‘काळा दिन’ पाळण्यात येतो. दरवर्षी कर्नाटक सरकारकडून बंदी घातली जाते. दडपशाही केली जाते. मात्र, ही दपहशाही झुगारून मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.
मराठी भाषिक लढय़ाचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये सकाळी नऊच्या सुमारास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात अभिवादन करून या निषेध सायकल फेरीस सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख भागांतून आलेल्या या फेरीचा समारोप मराठा मंदिर येथे झाला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
दरम्यान, युवक समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना निषेध फेरीत कानडी पोलिसांनी सहभागी होऊ दिले नाही. तर, ‘कन्नड रक्षण वेदिके’च्या काही गुंडांनी फेरीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान, सीमाभाग समन्वय समितीचे अध्यक्ष व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनाही पोलिसांनी सीमाभागात जाण्यास अटकाव केला. तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया सर्व मार्गांवर कर्नाटक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बेळगावमध्ये जाणाऱ्या शिवसैनिकांना रोखले
मराठी भाषिकांच्या मूक सायकल फेरीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून येणारे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह 25हून अधिक जणांना बेळगाव जिह्यात येण्यास बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून बंदीचा आदेश काढण्यात आला होता. तरीसुद्धा या बंदी आदेशाची पर्वा न करता आज सकाळी शिवसैनिकांनी बेळगावकडे कूच केले. दूधगंगा नदीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात शिवसैनिकांना अडविण्यात आले. त्यामुळे कर्नाटक सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

























































