समृद्धी महामार्गावर भाविकांच्या बसला अपघात; कर्जतमधील दोघे ठार

शेगाव आणि पंढरपूर येथे निघालेल्या भाविकांच्या बसला समृद्धी महामार्गावर अपघात होऊन दोघांचा मृत्य झाला. ही दुर्घटना आज पहाटे महामार्गावरील बोगदा क्रमांक 628.5 जवळ घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघेही कर्जतमधील कुशिवली आणि दहिवली येथील आहेत. चालकाला डुलकी लागल्यामुळे सुसाट वेगातील ही बस दुभाजकावर आदळून अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील भाविकांचा गट शेगाव व पंढरपूर देवदर्शनासाठी टाटा मिनी बसने आज पहाटे सुमारे तीनच्या सुमारास निघाला होता. सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांची बस समृद्धी महामार्गावर बोगदा क्रमांक 628.5 येथे पोहोचली असता चालकाला डुलकी लागली. त्यामुळे ही भरधाव बस दुभाजकावर आदळली. या अपघातात बसचालक दत्ता ढाकवळ यांचा जागीच, तर सुरेश लाड (62) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या ठिकाणी उपस्थित असलेले सुरक्षारक्षक विनोद पवार व मंगेश महाजन यांनी ही घटना पाहताच तत्काळ पोलिसांना कळवले. काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक पवार, हवालदार योगेश जाधव व अन्य सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी सुरेश लाड, सुरेखा लाड, नंदकुमार मोरे व राजेश लाड यांच्यासह अन्य भाविकांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना सुरेश लाड यांचा मृत्यू झाला.

कुशिवली, दहिवलीवर शोककळा

इगतपुरी परिसरात समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात कुशिवली येथील दत्ता ढाकवळ आणि दहिवली येथील सुरेश लाड यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कर्जतजवळ असलेल्या दोन्ही गावांवर शोककळा पसरली. या अपघातप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.