
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज नवा इतिहास रचला. ‘इस्रो’ने तब्बल साडेचार हजार किलो वजनाचा ‘सीएमएस 03’ हा उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. एलव्हीएम-3 एम-5 या ‘बाहुबली’ रॉकेटने ही कमाल केली. ‘इस्रो’ने अवकाशात सोडलेला आजवरचा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱया लाँच पॅडवरून सायंकाळी 5 वाजून 26 मिनिटांनी बाहुबली रॉकेटने उपग्रहासह अंतराळाच्या दिशेने उड्डाण भरले. उड्डाणानंतर जवळपास 16 मिनिटानंतर उपग्रह रॉकेटमधून वेगळा झाला व विशिष्ट कक्षेत स्थिरावला.
हिंदुस्थानचा तिसरा डोळा
‘इस्रो’ने आज प्रक्षेपित केलेला ‘सीएमएस-03’ हा विविध फ्रिक्वेन्सी बॅण्डमध्ये संदेश वहन करू शकणारा उपग्रह आहे. हा उपग्रह हिंदुस्थानी भूप्रदेशासह अवाढव्य अशा सागरी प्रदेशातही सेवा देऊ शकणार आहे. या उपग्रहामुळे दूरदर्शन प्रसारणाबरोबरच इंटरनेट, लष्करी व नौदलाची संपर्क यंत्रणा अधिक कार्यक्षम व व्यापक होण्यास मदत होणार आहे. एक प्रकारे हा उपग्रह अंतराळात देशाचा ‘तिसरा डोळा’ म्हणून काम करणार आहे.



























































