
अरबी समुद्रात दाखल झालेल्या ‘मोंथा’ वादळामुळे पाऊस अद्याप सिंधुदुर्गात अडकलेलाच आहे. सकाळ आणि सायंकाळच्या कामाच्या वेळेतच त्याची हजेरी असल्यामुळे जिल्ह्यातील काही भागात भात कापणी अद्याप रखडली आहे. पीक आडवे झाले असून पाण्यात पडलेल्या दाण्याला पुन्हा कोंब येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वातावरणात मासेमारीबरोबरच पर्यटन व्यवसायाला ब्रेक लागला असून मोठे नुकसान झाले आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी वातावरण निरभ्र असल्यामुळे भात कापणीच्या कामांना वेग आला. देवगड, वेंगुर्ले तालुक्यातील भरडी जमिनीवरील बहुतांश कापणी आटोपली. सध्या गावात देवदिवाळीपर्यंत उत्सवाचा माहोल असल्यामुळे शेतकरी काहीसे निश्चिंत असताना अचानक आलेल्या ‘मोंथा’ वादळामुळे सिंधुदुर्गात पाऊस पुन्हा सक्रिय झाला.
मे महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात आपला मुक्काम कायम ठेवला असल्याचे दिसून येत आहे. वेंगुर्ले तालुक्यातील चिपी, परुळे, भोगवे, निवती, खवणे, कोचरा, मळई समुद्रपट्टय़ातील तसेच कर्ली नदी किनाऱयावरील सोनवडे, बाव, कवठी, चेंदवण, झाराप, वालावल, हुमरमळा गावात पाणथळ भागातील भातशेतीमध्ये पाणी साचले आहे. पिके आडवी पडून पाण्यात पुजण्याची शक्यता आहे.
देवगड तालुक्यातील रेंबवली, पुवळे, साळशी, शिरगाव, शेवरे, पाडाघर, ओंबळ, आरे, तोरसोळे, वळीवंडे परिसरातही सायंकाळच्या वेळाने येणारा पाऊस भात, नाचणी, वरी, उडीद, भुईमूग शेतीला नुकसान पोहोचवणारा ठरत आहे. मशागतीच्या कामापासून सुरू झालेल्या या पावसाचा प्रवास भात कापणी, झोडणीपर्यंत थांबलेला दिसून येत नाही.



























































