
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा असलेला शहाड पूल सोमवार ३ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत डांबरीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हे काम हाती घेतले जाणार आहे. या काळात पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात येणार असून या मार्गावर जड व अवजड वाहनांना दररोज सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते १० या वेळेत प्रवेशबंदी असेल.
यापूर्वी २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यावेळी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुलावरील परिस्थिती जैसे थे असल्याची वाहनचालकांकडून तक्रार केली जात होती. आता डांबरीकरणाचे काम होणार असल्याने पुन्हा २० दिवस वाहनचालकांसाठी कोंडीचे ठरणार आहेत. उल्हासनगर वाहतूक उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची शक्यता असल्याने ठाणे वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
प्रवेश बंद आणि पर्यायी मार्ग
अहिल्यानगरकडून माळशेजमार्गे कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मुरबाडच्या वेशीवर बारवी डॅम फाटा येथे प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग हा बारवी धरण रस्ता बदलापूर रस्ता – बदलापूर – पालेगाव नेवाळी नाका मंलग रस्ता लोढा पलावा/शिळ-डायघर रस्ता – पत्रीपूल कल्याण मार्गे पुढे जातील. मुरबाडकडून शहाड पुलावरून कल्याणकडे जाणाऱ्या या वाहनांना दहागाव फाटा रायते गाव येथे प्रवेशबंदी असेल. त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग हा दहागाव फाटा रायतेगाव येथून वाहोली- मांजर्ली दहागाव – एरंजडगाव – बदलापूर – पालेगाव नेवाळी नाका – मंलग रोड – लोढा पलावा/शिळ-डायघर रोड – पत्रीपूल – कल्याण असा असेल. तर कल्याणकडून मुरबाडकडे जाणाऱ्या वाहनांना दुर्गाडी पुलाजवळ प्रवेशबंदी असेल. त्या वाहनांना पर्यायी मार्ग हा पत्रीपूल – चक्कीनाका गोविंदवाडी बायपास नेवाळी – पालेगाव – बदलापूर मार्गे मुरबाड असा असेल.



























































