
केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कलाजवळ एक भीषण अपघात घडला. येथे रेल्वेतील एका मद्यधुंद प्रवाशाने 19 वर्षीय तरूणीला चालत्या ट्रेनमधून धक्का देत ट्रेनबाहेर फेकले आहे. या घटनेमुळे तरूणीला दुखापत झाली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकुट्टी असे या पीडित तरूणीचे नाव असून ती पालोडेची रहिवाशी आहे. रविवारी श्रीकुट्टी आपल्या एका मैत्रिणीसोबत केरल एक्सप्रेसने अलुवा ते तिरुवनंतपुरम असा प्रवास करत होती. प्रवासादरम्यान जेव्हा श्रीकुट्टी आणि तिची मैत्रीण अर्चना शौचालयातून बाहेर आल्या तेव्हा दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी सुनिल कुमारने श्रीकुट्टीला चालत्या ट्रेनमधून ढकलले, असा आरोप आहे.
दरम्यान , प्रवाशांनी तातडीने आपत्कालीन चेन ओढली आणि पोलीस तसेच रेल्वे संरक्षण दलाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तातडीने तरूणीचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी श्रीकुट्टी वर्कला स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रुळांवर पडलेली आढळली. तिला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने, तिला नंतर तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन कोचुवेली स्टेशनवर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी श्रीकुट्टीची मैत्रीण अर्चनाने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली की, तिच्यावर आणि पीडितेवर अचानक हल्ला करण्यात आला. आरोपीने श्रीकुट्टीला ट्रेनमधून ढकलले आणि नंतर मला खाली फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर प्रवाशांनी मला मदत केली, असे तिने सांगितले.
सध्या पोलिसांनी आरोपी सुनिल कुमारला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.



























































