महिला डॉक्टरचे चारित्र्य हनन करणाऱ्यांवर कारवाई करा! फलटण पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे सहा तास ठिय्या आंदोलन

सातारा फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शिवसैनिक व नागरिकांनी आज थेट फलटण पोलीस ठाण्यासमोर सहा तास ठिय्या आंदोलन केले. हे पोलीस ठाणेच छळछावणी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्यासह सहाजणांची नावे रेकॉर्डवर घेऊन त्यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची आणि त्या महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे आज फलटणमध्ये धडकल्या. यावेळी शिवसेनेचे जिह्यातील पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला. तब्बल सहा तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘मस्तवाल सरकारचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उपनेते शरद कोळी, उपनेत्या छायाताई शिंदे, महिला आघाडीच्या सातारा जिल्हा संपर्कप्रमुख युगंधरा साळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले, यशवंत घाडगे, हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार गोरे, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही खरपूस शब्दांत समाचार घेतला.