माथेरानच्या राणीचा प्रवास लांबणीवर; पर्यटकांचा हिरमोड

1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी झोकात सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच मुहूर्त टळल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. चार दिवसांपूर्वी या टॉयट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी होऊनही अद्याप गाडी सुरू झालेली नाही. त्याचा परिणाम पर्यटनावर होत असून सर्वांची लाडकी माथेरानची राणी प्रत्यक्षात धावणार तरी केव्हा, असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे.

पावसामुळे टॉयट्रेन पाच महिने बंद होती. वादळी वारे आणि पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे रेल्वे रूळ नादुरुस्त झाले. ट्रॅकवर अक्षरशः खड्डे पडले होते. रेल्वे प्रशासनाने पाऊस संपताच डागडुजीची कामे हाती घेतली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी सहा ते आठ तास गाडीची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून माथेरानची राणी सेवेत रुजू होईल, असे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

शनिवार व रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटकांनी १ नोव्हेंबर रोजी सकाळीच नेरळ स्थानक गाठले. आता आपल्याला टॉयट्रेनमधून प्रवास करता येईल या आशेने बच्चे कंपनीही खूश झाली होती. पण चौकशी करताच पर्यटकांचा हिरमोड झाला. गाडी बंद असल्याचे सांगण्यात आले. आता सर्वजण वाट पाहात आहेत प्रवास करायला केव्हा मिळणार याची.