
ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयातील आणखी एक गलथान कारभार समोर आला आहे. कळवा नूतनीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नूतनीकरण सुरू असताना ऑक्सिजन वाहिनी टाकण्यासाठी निविदा काढली नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान अतिरिक्त पदभार डॉ. स्वप्नाली कदम यांच्याकडे देण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.
कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण करताना ऑक्सिजन वाहिनी बसवण्याची निविदाच काढण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला. यावरून कळवा रुग्णालयाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनीदेखील कळवा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे नूतनीकरण होत असताना ऑक्सिजन वाहिनी टाकण्यासाठी निविदाच काढण्यात आली नसल्याने डीन डॉ. राकेश बारोट यांना ही चूक भोवली असून अखेर प्रशासनाने त्यांची बदली करून त्या ठिकाणी डॉ. स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली आहे.
            
		





































    
    





















