
बंगळुरूमध्ये काही महिन्यांपूर्वी डॉ. महेंद्र रेड्डी या डॉक्टरने आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केली. आधी हा मृत्यू नैसर्गिक सांगण्यात आला त्यांनंतर सहा महिन्यांनी शवविच्छेदन अहवालात एनस्थेशियाचे ड्रग आढळल्यानंतर हत्या उघड झाली होती. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. 24 एप्रिल रोजी आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर काही आठवड्यांनी रेड्डी याने किमान चार ते पाच महिलांना मेसेज पाठवले होते. त्यात त्याने प्रत्येकीला तुला मिळविण्यासाठी मी माझ्या पत्नीला मारले, असे लिहिले होते. त्यात एका वैद्यकीय तज्ज्ञालाही मेसेज केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठविलेल्या मेसेजमध्ये एका वैद्यकीय तज्ज्ञ महिलेचा समावेश होता. जिने त्याच्या लग्नाच्या मागणीला नकार दिला होता. ती डॉक्टर नव्हती. तिने महेंद्रला अनेक मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले होते. त्यानंतर महेंद्रने फोनपेद्वारे तिला मेसेज पाठवला होता. पोलिसांनी महेंद्रचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे आणि तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवला आहे. यातील डेटावरून हा मेसेज समोर आला आहे. डीसीपी के. पराशर यांनी संदेश फोनपेद्वारे पाठवण्यात आल्याची पुष्टी केली. महिलेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. मात्र, तपास सुरू असल्याने पोलीस कोणतीही माहिती देत नाहीत.
सहा महिन्यानंतर तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले, डॉक्टर पतीनेच कट रचून केली हत्या
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने महेंद्रला त्याच्या लग्नापूर्वी ब्लॉक केले होते. जेव्हा तिला तो कृतिकाशी लग्न करणार असल्याचे कळले तेव्हापासून तिने त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवले. पत्नीच्या हत्येच्या काही महिन्यांनी महेंद्रने तिला हा कबुलीजबाब पाठवला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महेंद्रला हत्येसाठी अटक होईपर्यंत, महिलेला असे वाटत होते की तो तिच्याशी बोलण्यासाठी खोटं बोलत आहे. त्यामुळे त्या महिलेचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नव्हता. तसेच महेंद्र 2023 पर्यंत मुंबईतील एका महिलेच्या संपर्कात होता. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती आणि काही वेळा तिला भेटला होता. नंतर त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की, त्याचे अपघातात निधन झाल्याचे तिला सांगा. असे सांगून तिच्याशी संपर्क तोडला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये, त्याने तिला फोन करून तो जिवंत असल्याचे सांगितले. त्याच्या पत्रिकेनुसार त्याची पहिली पत्नी मरणार होती आणि त्याचे तिच्यावर खरे प्रेम होते. त्यामुळे त्याने तिच्याशी खोटे बोलून कृतिकाशी लग्न केले. आता त्याची पत्नी मरण पावली आहे म्हणून तो तिच्याशी लग्न करू इच्छित होता. म्हणून तिलाही मेसेज केला होता.



























































