सत्ताधारी सोडून सर्वपक्षीय विरोध असताना निवडणूक घेण्याची इतकी घाई का? राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले…

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली असून २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यातच मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ आहे. सत्ताधारी पक्ष सोडले तर इतर सर्वपक्षीय लोकांचा विरोध असताना निवडणूक घेण्यासाठी इतकी घाई का? मतदारयादीत अनेक दुबार, तिबार मतदार आहेत, एकेक घरात ४० -४५ लोकांनी मतदान केलं आहे, असं असताना इतकी घाई का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी दिनेश वाघमारे यांना विचारला असताना ते म्हणाले की, “दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केल्या आहेत. जिथे दुबार आणि तिबार मतदार आहेत, तिथे आमचे लोक मतदारांपर्यंत जातील. त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आवाहनाला प्रतिसाद देणार नाही, अशावेळी त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे”, असं ते म्हणाले. यातच सर्वपक्षीय विरोध असताना निवडणूक घेण्याची इतकी घाई का? या मूळ प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी यावेळी टाळलं.

विरोधी पक्षांचा आरोप आहे की, निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत, त्यांच्या सांगण्यावरून काम करत आहे, असा प्रश्नही पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “हे चुकीचं असून निवडणूक अयोग्य कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही.”

मतदार यादीतील दुबार नावांबाबत काय म्हणाले राज्य निवडणूक आयुक्त?

पत्रकार परिषदेत दुबार मतदारानाबद्दल बोलताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले आहेत की, “मतदार यादीतील दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपल्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे. आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह आलेले असेल. जिथे-जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहेत तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना संपर्क करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये मतदान करेल याची माहिती घेईल. यासोबत त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटो आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल. ज्या मतदान केंद्रामध्ये त्याने पर्याय दिलेला आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल. आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही. ज्या मतदारांच्या नावाने डबल स्टार आलेला आहे पण त्याने काही प्रतिसाद दिलेला नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याची डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून काही डिक्लेरेशन घेतले जाईल की, या मतदान केंद्रा व्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्याने मतदान केलं नाही किंवा करणार नाही. म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल.”

दरम्यान, निवडणुकीस पात्र असलेल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे. एकूण ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवड होणार आहे. २४६ नगरपरिषदांमध्ये १० नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे. आणि २३६ नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम –

१० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येईल

१७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल

अर्ज माघारीसाठी २१ नोव्हेंबरची मुदत असेल

२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी