
अलिबाग-रोहे मार्गावरील रामराज पुलासह पाच पुलांचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. मात्र याच मार्गावरील सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या खानाव पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हे पाप बांधकाम खात्याचेच आहे. त्यामुळे धोकादायक पूल असूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर गुहे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील खानाव येथील पूल कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली. सदर दुर्घटना ही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे घडल्याचे आरोप होत आहे’. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, यामध्ये रामराज पूल, सुडकोली येथील २ पूल तसेच इतर २ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. मात्र दुर्घटनाग्रस्त वढाव येथील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यातच आले नव्हते. यामुळे बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कंत्राटदाराची बिले लटकवली
अलिबाग-रोहा मार्गाचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण तसेच काही नवीन पुलांच्या उभारणीसाठी २०१९ मध्ये १७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र सदर काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. यांनतर ठेकेदार बदलून हे काम नव्या कंत्राटदाराला देण्यात आले. परंतु कामांची कोट्यवधींची बिले लटकवल्याने सध्या हे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविरोधात संताप
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या गेल कंपनीची अवजड वाहतूक या मार्गावरून सुरू आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक करू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपनी व्यवस्थापनेसोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीची यंत्रे नेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सदर मार्गावर इतर वाहनांना नो एण्ट्री केली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या परवानगीबाबत संताप व्यक्त होत आहे.






























































