
कल्याण रेल्वे स्थानकाच्या पुलावर गाढ झोपेत असलेल्या आईच्या कुशीतून आठ महिन्यांच्या बाळाचे एका तरुणाने अपहरण केले होते. बाळ चोरीस गेल्याच्या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली होती. मात्र कल्याण महात्मा फुले पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत अपहरणकर्त्या तरुणांसह त्याच्या आत्यावर झडप घालून बाळाची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या सहा तासांत बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले. आरोपी अक्षय खरे आणि सविता खरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नीलेश पोंगरे व पूनम पोंगरे हे दाम्पत्य पुणे येथे राहतात. आज कामानिमित्त रेल्वेने कल्याणला आल्यानंतर पहाटे हे दाम्पत्य मुलासह स्टेशनवरील पुलावर झोपले होते. त्यांना जाग येताच बाळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.
हवालदार सोनावणे यांच्यामुळे गुंता सुटला
महात्मा फुले पोलीस ठाण्याचे हवालदार सतीश सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा गुंता सुटला. सोनवणे यांनी सीसीटीव्हीत आरोपीला पाहताच ओळखले. यानंतर पोलिसांच्या पथकाने तत्काळ अक्षयचे घर गाठले असता घरात बाळ आढळून आले. अवघ्या सहा तासांच्या आत बाळाची चोरी करणाऱ्या अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या.






























































