पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, रेल्वेच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या चुनार येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चुनार रेल्वे स्टेशनवर बुधवारी काळका एक्स्प्रेसच्या धडकेत 8 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अपघातात भाविकांच्या शरिराच्या चिंधड़्या उडाल्या असून त्यांचे मृतदेह ओळखणे मुश्किल झाले आहे.

चुनार रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला आहे. कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी चुनार गंगा घाटावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हे भाविकही स्नानासाठी तिथे चालले होते. दरम्यान ट्रॅक ओलांडत असताना कालका एक्सप्रेसच्या धडकेत सात ते आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शॉर्टकटने जाण्यासाठी हे भाविक रेल्वेट्रॅक ओलांडत होते.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि शासकीय रेल्वे पोलीसचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी रेल्वे ट्रॅकवरून मृतांचे अवयव आणि अवशेष बाजूला केले. अपघातामुळे रेल्वे ट्रॅकवर मृतदेहांचे झालेले तुकडे पोलिसांनी समूहित केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे चुनार रेल्वे स्टेशन परिसरात आणि गंगा घाटावर शोकाकुल आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.