हरयाणात 25 लाख मतांची चोरी, बिहारमध्येही हेच होणार; राहुल गांधी यांनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा “मतांची चोरी” या मुद्द्यावर प्रेझेंटेशन दिले. कर्नाटक आणि महाराष्ट्रानंतर आता हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की “‘एच फाइल्स’ हा एका मतदारसंघाचा मुद्दा नाही, तर विविध राज्यांमध्ये मत चोरीची मोठी साजिश रचली गेली आहे.”

राहुल गांधी म्हणाले की हरियाणामध्ये प्रथमच पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांच्या निकालात मोठा फरक दिसला. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसला 76 जागा आणि भाजपला फक्त 17 जागा मिळाल्या असत्या. पूर्वी दोन्हींचा कल जवळपास सारखाच असायचा.

काँग्रेस नेत्यांनी सांगितले की एग्झिट पोल आणि पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर होती, पण शेवटी ती 22,779 मतांनी पराभूत झाली. एक लाखाहून अधिक मतांचा फरक दिसून आला. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. त्यांनी दावा केला की ते जे काही सांगत आहेत ते 100 टक्के सत्य आहे.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमधील मुख्य मुद्दे

1. राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत सांगितले की या मुलीचे नाव वेगवेगळ्या नावांनी 22 ठिकाणी मतदार यादीत आहे. तिने कधी सीमा, तर कधी सरस्वती या नावाने 22 ठिकाणी मतदान केले. एका ब्राझिलियन मॉडेलचे नाव हरियाणाच्या मतदार यादीत कसे आले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

2. हरियाणामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एकूण 25 लाख मतांची चोरी झाली. 5 लाख 21 हजारांहून अधिक दुबार मतदार आढळले.

3. राहुल गांधी म्हणाले की हरियाणात एकूण सुमारे दोन कोटी मतदार आहेत. जर 25 लाख मतांची चोरी झाली असेल, तर याचा अर्थ प्रत्येक आठपैकी एक मतदार बनावट होता. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला.

4. राहुल गांधी यांनी असा दावा केला की एका बूथवर एका महिलेचे नाव 223 वेळा नोंदले गेले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला विचारले की त्या महिलेनं किती वेळा मतदान केलं? त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सांगितले की 9 पुरुषांच्या नावांच्या जागी महिलांची नावे टाकण्यात आली आहेत.

5. राहुल गांधी यांनी आरोप केला की हरियाणात जे घडले, तेच बिहारमध्ये होणार आहे. बिहारमध्येही मतदार यादीत गडबड झाली आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला मतदार यादी शेवटच्या क्षणी दिली गेली.

6. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधींनी बिहारमधील अनेक मतदारांना मंचावर बोलावले आणि दावा केला की त्यांची नाव मतदार यादीतून हटवण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. बिहारमध्ये लाखो लोकांची नावे हटवण्यात आली आहेत.

7. देशातील तरुणांना आवाहन करत राहुल गांधी म्हणाले की भारतातील जेन झी आणि युवकच सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लोकशाहीचे रक्षण करू शकतात.

8. राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना सांगितले की घर नसलेल्या लोकांच्या नावांसमोर “घर क्रमांक शून्य” दाखवला जातो. त्यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओही दाखवला ज्यात घर नसलेल्या लोकांच्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली जात होती. राहुल गांधी म्हणाले की आम्ही हे तपासले आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशाच्या जनतेशी उघडपणे खोटे बोलले आहे.

9. राहुल गांधी म्हणाले की हा दालचंद उत्तर प्रदेशातही मतदार आहे आणि हरियाणामध्येही मतदार आहे. त्याचा मुलगाही दोन्ही ठिकाणी आहे आणि दोन्ही ठिकाणी भाजपला मत देतो. असे हजारो लोक आहेत ज्यांचा भाजपशी संबंध आहे. मथुराच्या सरपंच प्रल्हादचे नावही हरियाणाच्या मतदार यादीत अनेक ठिकाणी आहे, आणि त्यांचा भाजप नेत्यांसोबतचा फोटोही दाखवण्यात आला.

10. सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की हे सर्व मतदार 103 आणि 104 क्रमांकाच्या घरांमध्ये राहतात. ही कोणत्या प्रकारची यादी आहे? निवडणूक आयोगाकडे याचा डेटा आहे का? एका महिलेला 223 वेळा एका बूथवर मतदान करण्याची परवानगी कशी मिळाली? म्हणूनच निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले आहे. कारण लोकांनी अनेकदा मतदान केले. ते असं का करत आहेत? कारण ते यासाठीच एक “स्पेस” निर्माण करत आहेत. म्हणून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज हटवली आहे. ममता, दुर्गा, संगीता, मंजू या कोणालाही कुणी ओळखत नव्हतं, पण त्या आल्या आणि म्हणाल्या “माझं नाव दुर्गा आहे” आणि मतदान केलं.