
>> संजय कऱ्हाडे
विश्वचषकाचा स्पर्श म्हणजे आनंदघनाचा स्पर्श! अलौकिक असा हा क्षण आपल्या महिला विश्वकप विजेत्या संघाने आणि त्यांच्या प्रशिक्षकाने अनुभवला! अनेकानेक आयासानंतर मिळालेला विजय त्यांचे अश्रू मधुर करून गेला असणार यात वादच नाही! परिश्रमी हरमनप्रीत, तपस्वी अमोल मुजुमदार आणि पंपनीचं मनापासून अभिनंदन! समस्त महिलावर्गाचा सन्मान वाढवल्याबद्दल अन् काही फुटकळ पौरुषवादी नरांचा उपमर्द केल्याबद्दल त्यांचे बेंबीच्या देठापासून आभार! अन् यापुढील अगणित पिढय़ांना प्रोत्साहित करण्यासाठी मान तुकवून जोहार!
आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात असा जोहार करायला लावणारा लाल कुणी आहे का ते आजमावू!
कप्तान सूर्यकुमार. डोळे छोटे-मोठे करणं, हावभाव करणं, खांदे उडवणं, स्वतःच्याच बाद होण्यावर आश्चर्यचकित होणं. परिश्रम खतम. शुभमन. तांत्रिकदृष्टय़ा अतिशय उत्तम फटका मारून क्षेत्ररक्षकाच्या हाती सहज-सुलभ झेल! अभिषेक. मुंबई क्रिकेटमध्ये फारा वर्षांपासून एक वाक्प्रचार प्रचलित आहे. आजही असावा. ‘बनी तो बनी, नहीं तो अब्दुल घनी.’ हल्लीच्या पिढीला याचा अर्थ कळत नसेल तर अभिषेकची फलंदाजी पाहून कळेल. संजू सॅमसन. राहू द्या. पिटे हुए को फिर क्या पीटना! तिलक वर्मा. याच्यासाठी अजून जीव आहे, अशी हाकाटी पिटता येऊ शकेल.
अक्षर, वरुणकडून मला अजून आशा आहेत. अर्शदीप तर मनाला उभारी देतो. बुमराकडूनही खास निराशा झालेली नाही. पण त्याचं, ‘हेच अन् एवढंच खेळणार’ माझ्यासारख्याला तितकसं पटत नाही. खेळाडू एक तर फिट असतो किंवा नसतो! उन्नीस-बीस चलता है. पण याचं ‘बीस किंवा बैस’, मला झेन-जी भाषेत स्ट्रेस देतं!
हर्षित राणाबद्दल मला सहानुभूती आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने तेरा सामन्यांत पंधरा बळी घेतले होते, पण त्याची बॅटधारी कामगिरी यथातथाच होती. तरीही त्याच्यावर कुणाची वक्रदृष्टी पडण्याचं कारण नव्हतं. मात्र, आगौने अर्शदीप, कुलदीपसारख्याला वेठीस धरून पक्षपात केला तेव्हा आगौवर आसुड बरसले अन् राणाजींचं ओलं सुक्याबरोबर जळलं!
कुलदीपला तर घरच्या मैदानांवर गोलंदाजी करण्याचा सराव करण्यासाठी या महामानवांनी माघारीच पाठवलंय! न रहें बांस, न बजे बांसुरी! आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘अ’ संघातून खेळणार आहे!
सुंदर, शिवम, रेड्डी, जितेश इत्यादी आहेत. यांचं नक्की असं काही नाही. थोडक्यात भूमिका-त्रिशंकू.
टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात आहे. फक्त चार महिन्यांनंतर! आगौ, ठोस पावलं उचला. धोरणं पक्की करा. आमच्या आशा पल्लवित करा. मालिकेत बरोबरी झाली आहे, आज आघाडी घ्या, 8 तारखेला मालिका जिंका एवढी विनंती!


























































