अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती शिखरावर; टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत हिंदुस्थानींचा बोलबाला

आयसीसीच्या नव्या टी–20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत हिंदुस्थानी खेळाडूंनी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा तर गोलंदाजांच्या क्रमवारीत वरुण चक्रवर्तीने अव्वल स्थान पटकावले आहे. 2025 हे वर्ष हिंदुस्थानसाठी यशस्वी ठरत असून संघाने आतापर्यंतच्या पाच द्विपक्षीय मालिकांपैकी चार मालिका जिंकल्या आहेत. यामध्ये नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 अशी मालिकाही जिंकली होती. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हिंदुस्थानचा टी-20 संघ जगात सर्वाधिक स्थिर आणि प्रभावी संघ म्हणून ओळखला जात आहे.

इतर देशांच्या खेळाडूंनीही क्रमवारीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीजचा शाय होप दोन स्थानांनी वर जाऊन 12 व्या स्थानी आला आहे, तर बांगलादेशचा तंझिद हसन तब्बल 20 स्थानांची झेप घेत 17 व्या स्थानी पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झदरान यांनी अनुक्रमे 15 व्या आणि 20 व्या स्थानावर आपली जागा पक्की केली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीतही मोठे फेरबदल झाले आहेत. हिंदुस्थानचा रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानी कायम असून त्याच्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना चक्रावून सोडले आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दोन स्थानांनी वर येत 10व्या स्थानी पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा मुजीबूर रहमान 13 स्थानांची झेप घेऊन 14 व्या स्थानी आला आहे, तर बांगलादेशचा महेदी हसन सहा स्थानांनी वर येऊन 17 व्या स्थानी आहे.