
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. जवळपास २७५ कुटुंबे आणि १ हजार ६०० रहिवासी रस्त्यावर आले आहेत. या बेकायदा इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने आजपासून हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान एकीकडे शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असताना मात्र भूमाफिया, बिल्डर मोकाट कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी दिव्यात कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. एकूण ७ इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार असून सोमवारी दोन इमारती, मंगळवारी चार तर बुधवारी एक इमारत पूर्ण रिकामी करून त्यावर पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.
लाखोंचे फ्लॅट घेऊन बेघर होण्याची वेळ
सोमवारी घडलेल्या प्रकारानंतर तोडक कारवाईला पुन्हा अडथळा येऊ नये यासाठी मंगळवारी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सातही इमारतींमध्ये २७५ कुटुंबे वास्तव्यास होती. लाखो रुपये खर्च करून फ्लॅट विकत घेणाऱ्या य नागरिकांवर मात्र बेघर होण्याची वेळ आली आहे.





























































