हे खूप भयानक आहे! राहुल गांधी यांच्या गौप्यस्फोटानंतर ब्राझिलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, फोटोबाबतही केला खुलासा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग व मोदी सरकारच्या संघटित मतचोरीचा पर्दाफाश केला. हरयाणा विधानसभा निवडणुकीत 25 लाख मतांची चोरी झाली, असा गौप्यस्फोट करत राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटोही दाखवला. या मॉडेलने हरयात 22 वेळा मतदान केल्याचे त्यांनी समोर आणले. यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता ब्राझिलची ही मॉडेलही समोर आली असून तिने काही व्हिडीओ जारी करत यावर भाष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला फोटो आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या लरिसा या ब्राझिलच्या मॉडेलचा आहे. सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू असताना आता तिने व्हिडीओ पोस्ट करत यावर भाष्य केले असून हिंदुस्थानातील राजकारणाची आपला कोणताही संबंध नसून आपल्या फोटोचा गैरवापर केला जात आहे असे म्हटले. तसेच हा फोटो मॉडेलिंगच्या काळातील जुना स्टॉक फोटो असल्याचेही तिने म्हटले.

लरिसा ही एकेकाळी मॉडेलिंग करत होती. आता ती या क्षेत्रात कार्यरत नाही. मात्र इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर अनेक पत्रकारांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिने व्हिडीओ पोस्ट केला असून फोटोबाबतही खुलासा केला.

मी ब्राझिलियन डिजिटल इन्फ्लुएन्सर आणि हेअर ड्रेसर आहे. हिंदुस्थानातील राजकारणाची माझा काडीमात्रही संबंध नाही. माझा फोटो एका स्टॉक इमेज फ्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यात आला होता आणि माझ्या संमतीशिवाय वापरण्यात आला. मी कधीही हिंदुस्थानात गेलेली नाही, असे तिने व्हिडीओद्वारे स्पष्ट केले.

माझ्या इन्स्टा अकाऊंटवर अनेक हिंदुस्थानी फॉलोअर्स मिळाले आहेत. लोक माझ्या फोटोवर कमेंट करत असून मी निवडून आल्यासारखे वाटत आहे. स्पष्ट सांगायचे तर तो माझा स्टॉक फोटो होता. तेव्हा मी 18 वर्षांची असेल आणि मॉडेलिंग करायचे. मला तुमची भाषा येत नाही, फक्त नमस्ते बोलता येते. यामुळे मी फेमस होईल असे वाटत होते. पण आता मला याचे गांभीर्य करत आहे. हे खूप भयानक आहे, असे ती म्हणाली.

ब्राझिलच्या मॉडेलने केले 22 वेळा मतदान! हरयाणात 25 लाख मतांची चोरी; B ब्राझिलियन, J जनता, P पार्टी