
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची पहिली तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून झाली आहे. काँग्रेसने ही तक्रार केली असून भाजपच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली गेली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर केलेली ही पहिलीच तक्रार आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत मूल नगर पालिकेचा समावेश आहे.
मूल शहरात गुरुवारी वृत्तपत्रांमधुन घरोघरी भाजपने पाँम्प्लेट वितरीत केले. त्यात शहराच्या विकासासाठी सुचना देणाऱ्या मतदार असलेल्या नागरीकांना हजारो रुपयांचे पारितोषिक देण्याच्या नावाखाली आमिष दाखवण्यात आले. शहराच्या विकासाविषयी सुचना मागायच्या होत्या आणि पारीतोषिक रूपात जनतेला हजारो रूपये द्यायचेच होते तर आजपर्यंत का नाही दिले, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
आचारसंहितेच्या काळात प्रसिध्दी पत्रक छापायचे असल्यास नियमानुसार निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असून त्यावर प्रकाशक, मुद्रक आणि प्रतिचा उल्लेख असणे अनिवार्य आहे. परंतु वितरीत करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकावर केवळ प्रकाशकाचे नाव असून इतर आवश्यक बाबींचा उल्लेख नाही. त्यामुळे अनधिकृत आणि मतदारांना आमिष दाखविणारे प्रसिध्दी पत्रक वितरीत करणाऱ्या भाजपविरूध्द कारवाई करावी, अन्यथा आम्हालाही असे उल्लंघन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.





























































