महायुती सरकारविरोधात बेरोजगारांचा ठिय्या; सलग दुसऱ्या दिवशी प्रतीकात्मक कुभमेळा, नऊ जणांचे अन्नत्याग आंदोलन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या नावाखाली महायुती सरकारने राज्यातील हजारो बेरोजगारांना फसवले. त्यामुळे या संतप्त तरुणांनी कायमस्वरूपी कामाच्या मागणीसाठी सरकारविरोधात नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ठिय्या मांडून प्रतीकात्मक कुंभमेळा भरवला आहे. नऊ जणांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने शब्द पाळावा अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील दहा लाख बेरोजगारांना रोजगार मिळवून देऊ असे सांगून महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली. मात्र राज्यभरातील 1 लाख 34 हजार प्रशिक्षणार्थींना रोजगाराची हमी मिळाली नाही. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र असंतोष उफाळला आहे. सांगलीच्या जत येथील ह.भ.प. तुकारामबाबा महाराज आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चापूरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांत ठाणे, मुंबईत आंदोलन छेडूनही सरकारने बेदखल केले. त्यामुळे नाशिकमध्ये प्रतीकात्मक पुंभमेळा भरवण्यासाठी पाच हजारांहून जास्त तरुण बुधवारी येथे दाखल झाले. प्रातिनिधिक स्वरूपात काहींनी गोदावरी नदीत स्नान केले. आमची ही साडेसाती दूर व्हावी, आम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळावी, असे त्यांनी गोदामाईला साकडे घातले.

त्यांनी बुधवारी दुपारपासून सिव्हिल रुग्णालयासमोरील इदगाह मैदानात ठिय्या मांडला. सलग दुसऱया दिवशी आज त्यांचे आंदोलन सुरू होते. राज्यभरातून आंदोलकांचा ओघ येथे सुरूच होता. विक्रम पावरा (धुळे), नारायण कापडी, दीपक येवे (अहिल्यानगर), संजय खेडके (हिंगोली), जयसिंग वळवी (नंदुरबार), विशाल जाधव (बार्शी), अविनाश नागरे (बीड), सबेरा तडवी (जळगाव), रिना पहूरकर (अकोला) यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

‘अकरा महिन्यांचा कार्यकाळ संपला. मुख्यमंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द कुठे गेला?’, असा सवाल त्यांनी केला आहे. ‘प्रशिक्षणार्थी एकजुटीचा विजय असो’, ‘कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आज पाच हजार तरुण आंदोलन करीत आहेत यात राज्यभरातून हजारो जण सहभागी होतील. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा दिला आहे.

…अन्यथा मंत्रालयावर धडक देणार  

नाशिक शहरात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बेरोजगार तरुणांना व्यथा मांडायच्या आहेत. यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले आहे. मात्र परवानगी न मिळाल्यास हजारो बेरोजगार त्यांच्या भेटीसाठी धडकणार आहेत. तसेच उद्याच दोन हजारांहून अधिक जण मुंबईकडे पूच करून मंत्रालयासमोर ठिय्या मांडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.