
पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. मात्र, मुदत संपूनही ठेवींची रक्कम परत न करता, ठेवीदार व त्याच्या कुटुंबीयांची 1 कोटी 10 लाख 8 हजार 323 रुपयांची फसवणूक केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, विशेष वसुली अधिकारी अशा 22 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेअरमन प्रभाकर नारायण कवाद, व्हाईस चेअरमन रामदास बाबुराव लंके, संचालक बाळासाहेब गणाजी लामखडे, मच्छिंद्र जिजाबा लंके, नामदेव हरिभाऊ पठारे, रायचंद खंडू गुंड, भाऊसाहेब विठोबा लामखडे, संतोष बन्सी येवले, भास्कर तुकाराम शेळके, राजेंद्र भागा लाळगे, प्रकाश शिवराम कवाद, वसंत जानकू बुचडे, मुकुंद रामचंद्र निघोजकर, शंकर रामचंद्र वराळ, संजय बबन सोनवणे, पुष्पा प्रकाश पांढरकर, विजया लहू वागदरे, अविनाश पंढरीनाथ गांढरे, रामदास बाबुराव रोहिले, व्यवस्थापक दिलीप पोपटराव वराळ, पिंप्री जलसेन शाखाधिकारी संपत गणाची लामखडे, विशेष वसुली अधिकारी संतोष बाबुराव साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत ठेवीदार भाऊसाहेब लिंबाजी थोरात (वय 62, रा. पिंप्री जलसेन, ता. पारनेर, हल्ली रा. खराडी, पुणे) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मळगंगा नागरी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने ठेवींवर ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून ठेवी घेतल्या. त्या ठेवींची मुदत संपल्यावर फिर्यादी पैसे काढण्यासाठी संस्थेत गेले असता, त्यांना व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
फिर्यादीने याबाबत पदाधिकारी व संचालक मंडळाशी संपर्क साधला असता, त्यांनीही वेगवेगळी कारणे सांगत वेळ मारून नेली. अनेकदा पाठपुरावा करूनही ठेवींची 1 कोटी 10 लाख 8 हजार 323 रुपये एवढी रक्कम पतसंस्थेकडून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. संस्थेकडून फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्यावर भाऊसाहेब थोरात यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चेअरमनसह 22 जणांवर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे तपास करीत आहेत.


























































