
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. वन मंत्री गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी करण्यात आले असून त्यांच्याकडे सात विभागांची जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गणेश नाईक यांच्यात विस्तवही जात नाही. अशा परिस्थितीत भाजपने नाईक यांना निवडणूक प्रभारी करून शिंदे गटाची कोंडी करण्याचा डाव आखला असल्याची चर्चा आहे.
गणेश नाईक व एकनाथ शिंदे यांचे वैर जुने आहे. नाईक हे पालघरचे पालकमंत्री असूनही त्यांनी अनेकदा ठाण्यात शिंदे गटाला डिवचण्यासाठी जनता दरबार घेतला. तसेच त्यांनी ठाणे पालिकेतील भ्रष्टाचारावरदेखील जोरदार टीकास्त्र सोडले होते. मंगळवारी निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिकांचे वेळापत्रक जाहीर करताच भाजपने बुधवारी निवडणूक प्रभारींची यादी घोषीत केली. त्यात गणेश नाईक यांना स्थान दिले आहे.
राजकीय आखाडा रंगणार
महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या तारखादेखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी आता नाईक यांची ढाल पुढे केली आहे. त्यांच्याकडे ठाणे शहरासह ठाणे ग्रामीण, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण व उल्हासनगर विभागाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात शिंदे विरुद्ध नाईक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
संजीव नाईकही नवी मुंबईचे निवडणूक प्रमुख
माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे नवी मुंबईचा चार्ज दिला आहे. तेथील महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला कडवे आव्हान उभे करण्यासाठीच नाईक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

























































