
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. जरांगे-पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली असून आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद जरांगे-पाटील यांनी थेट माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. धनंजय मुंडे यांनी मला मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
काल हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती आणि यात एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप केला. यानंतर सर्व घटनाक्रम सांगत त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. यामुळे खळबळ उडाली असून मराठा समाजाने शांत राहावे असे आवाहन जरांगे यांनी केले.
मनोज जरांगे म्हणाले की, आजचा विषय महत्त्वाचा आहे. पोलिसांनी आरोपींना पकडले काय आणि सोडले काय, यात मला पडायचे नाही. बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते बसले होते. जनतेच्या कोर्टात काय आहे हे सर्वांना माहिती असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याबाबतीत मी बोलणार नाही.
बीडचा कांचन नावाचा माणूस असून तो धनंजय मुंडेंचा पीए की कार्यकर्ता आहे. हे षडयंत्र धनंजय मुंडे यांचे असून पीए आरोपीना घेऊन परळीला गेले. कांचन आणि मुंडेंमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली. आम्ही त्याला ठोकतो बोलल्यावर मुंडेनी त्यांची जुनी गाडी देण्याचे आश्वासन दिले, असा दावा जरांगे यांनी केला. खून करून राजकारणात माणूस मोठा होत नाही. हा प्रकार गंभीर असून सर्वांनी हुशार होणे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.


























































