
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसोबतचा संवाद दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. थापेबाज सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकर्यांची एकजूट आता महत्वाची असून, सर्व हेवेदावे दूर ठेवून संघटीत होऊन तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची वेळ आली आहे. तुमच्या नुकसानीची भरपाई पूर्णपणे मिळण्यासाठी मी संघर्ष करत आहे, तुम्हीही पेटून उठा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बळीराजाला दिले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



























































